नगरमध्ये `विनयभंगाच` प्रकरण तापलं : काॅंग्रेसच्या काळेंना भाजप व सेनेचाही पाठिंबा

आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व्यतिरिक्त सर्व प्रमुख पक्ष एकत्र आल्याची स्थिती आहे.
नगरमध्ये `विनयभंगाच` प्रकरण तापलं : काॅंग्रेसच्या काळेंना भाजप व सेनेचाही पाठिंबा
kale.jpg

अहमदनगर : महाराष्ट्राच्या उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा दौरा झाल्यावर गुरुवारी (ता. 2) किरण काळे यांनी अचानक एमआयडीसीतील आमदार संग्राम जगताप यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आयटी सेंटरला भेट देऊन गंभीर आरोप केले होते. तसेच काही फोटोही सोशल मीडियावर टाकले होते.

त्यानंतर शुक्रवारी (ता. 3) किरण काळे यांच्यासह आठ ते दहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग, बळजबरीने कार्यालयात प्रवेश करून दमदाटी करणे या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात किरण काळे यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषद त्यांनी आयटी सेंटरला भेट दिलेल्याचा व्हिडिओच दाखवला. तसेच आमदार संग्राम जगताप, त्यांचे कार्यकर्ते व एमआयडीसीतील आयटी पार्कवर गंभीर आरोप केले होते. 

हेही वाचा...

किरण काळे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांचे खंडण केले. तसेच आपली बाजू मांडली होती. या प्रकरणात आता आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व्यतिरिक्त सर्व प्रमुख पक्ष एकत्र आल्याची स्थिती आहे.

नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलीय. मध्यंतरी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर आय टी पार्क प्रकरणावरून विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा आधार घेत शिवसेना-भाजपचे नेते जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आज भेटण्यासाठी गेले होते. 

शिवसेनेचे आवाहन
आमदार अनिल राठोड हे जसे सामान्यांच्या मदतीला धावून जात होते. सामान्यांवर जर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार केला तर स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून पोलिसांना जाब विचारत होते. त्या प्रमाणे आता शिवसेना नेते काम करतील. ज्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी शिवालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

हेही वाचा...

नगर शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय दबावाचा वापर करतात व निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात. मध्यंतरी अशाच प्रकारे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर देखील आय टी पार्क पाहणी करण्यासाठी ते गेले असता त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदार महिलेचा बोलावता धनी कोण आहे हे सर्वाना ठाऊक आहे. एमआयडीसी पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी पडून हा खोटा गुन्हा किरण काळे यांच्यावर दाखल केला हे सर्वांना माहित आहे . पोलिसांनी अशा दबावाला किंवा अमिषाला बळी पडून निष्पाप लोकांवर अन्याय करू नये, बेकायदेशीरपणे वागू नये हे सांगण्यासाठी शिवसेना, भाजप  शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. 

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. 

Related Stories

No stories found.