
नवी दिल्ली : सत्तेतून सातत्याने नाकारलेले व झिडकारलेले एक घराणे देशातील तमाम व संपूर्ण विरोधी पक्षांंचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, एका घराण्याचे हित हे भारताचे हित होऊ शकत नाही, असा पलटवार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज केला.
भारत-चीन सीमा संघर्ष सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी हे सातत्याने भारताच्या पंतप्रधानांवर ट्विटरद्वारे शाब्दिक हल्ले करीत आहेत. त्यात ते 'सरेंडर' सारख्या शब्दांचे स्पेलिंग चुकविण्याच्या सारख्या चुकादेखील करत आहेत. सीमेवर भारतीय सैनिकांना शस्त्रे न घेता का पाठवले? या त्यांच्या प्रश्नांना देशाच्या माजी संरक्षणमंत्रयांनीच सर्वपक्षीय बैठकीत सूचक प्रत्युत्तर दिले होते. गांधी यांनी आतापावेतो किमान 17 ट्विट केली आहेत.
या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा विलक्षण आक्रमक झाले असून ते कॉंग्रेसच्या राजघराण्यावर आणि त्यांच्या दिल्लीतील माध्यमी दरबारी झिलकर्यांनाही झोंबणारे हल्ले करत आहेत.
नड्डा यांनी म्हटले की सारा देश चिनी संकटाच्या समयी एकजुट आणि आमच्या सशस्त्र दलांच्या बरोबर उभा आहे. फक्त एका घराण्याला याबाबत समस्या आहेत. यांच्या राजकुमाराला लॉन्च करण्याचे अगणित प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता हे देशाच्या सैन्याचे मनोबल खच्ची करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घराण्याला आणि त्याच्या राजनिष्ठ आणि एकनिष्ठ “ दरबारींना” आपण म्हणजेच देशातील तमाम सर्व विरोधी पक्ष आहोत, असा भ्रम झालेला दिसतो. त्यातूनच त्यांनी भारत - चीन सीमा विवादासंदर्भात अनेक असत्ये पसरवण्याचा प्रयत्न केला आणि आजही करीत आहेत.
नड्डा यांनी आज लागोपाठ केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की आज संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या बरोबर उभा आहे. फक्त एका घराण्याला त्याबाबत समस्या व शंका आहेत. सरकारला प्रश्न विचारणे हेच विरोधकांचे काम असते आणि नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही ते दिसून आले. अनेक राजकीय पक्षांनी सरकारला चीन संकटाबाबत अतिशय विधायक सूचना केल्या. अपवाद फक्त एका घराण्याचा ! माहिती आहे का कोण?, अशा भेदक प्रश्नाने भाजपाध्यक्ष नड्डा यांनी आपली आज सकाळची ट्विट मालिका संपविली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.