भाजप खासदार उन्मेष पाटलांनी स्वपक्षाच्या आमदार चव्हाणांच्या पराभवाचे षडयंत्र रचले  

२०१९ मधील विधानसभा निवडणूकीत भाजपाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेक डावपेच आखले. त्यांच्या पराभवाचे षडयंत्र रचले होते.
भाजप खासदार उन्मेष पाटलांनी स्वपक्षाच्या आमदार चव्हाणांच्या पराभवाचे षडयंत्र रचले  
Jalgaon BJP

जळगाव : २०१९  मधील विधानसभा (2019 assembly election) निवडणूकीत भाजपाने (BJP) मंगेश चव्हाण (Mangesh Chavan)  यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचे खासदार उन्मेष पाटील (M. P. Unmesh Patil)  यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेक डावपेच आखले. त्यांच्या पराभवाचे षडयंत्र (Conspiracy) रचले होते, असा आरोप भाजपाचे चाळीसगावचे (Chalisgaon) शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील (Ghrushneshwar Patil) यांनी केला आहे. 

यासंदर्भात त्यांनी खासदार उन्मेष पाटील यांना पत्र लिहिले आहे. त्यात भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी मित्रत्वाला तडा देत आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक षडयंत्रे रचली असा खळबळजनक आरोप केला. हे पत्र त्यांनी ज्यांच्यावर आरोप केला त्या खासदार उन्मेष पाटील यांनाच लिहिल्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांत चांगलीच खळबळ उडाली आहे. 

सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे. पक्षात आजपर्यंत जी गटबाजी असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. गटबाजीची ही गुपीते भाजपच्या शहराध्यक्षांनीच उघड केली. भाजपा शहराध्यक्षांकडूनच झालेल्या या आरोपबाजीमुळे खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील पक्षांतर्गत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. 

शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी म्हटले आहे की, २०१४ मध्ये भाजपाच्या उमेदवारीच्या बळावर व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उन्मेष पाटील हे आमदार  झाले. ते आमदार झाल्यानंतर चाळीसगाव शहराचे चित्र बदलेल अशी नागरीकांची अपेक्षा होती. त्याचाच भाग म्हणून ४५ वर्षाची शहर विकास आघाडीची सत्ता संपुष्टात आणून लोकनियुक्त नगराध्यक्षांसह १३ नगरसेवक निवडून दिले. त्यात मीही होतो. 

ते म्हणाले, २०१६ मध्ये मी शहराध्यक्ष झालो. आपल्या नेतृत्वाखाली काम करतांना आम्ही एकेक कार्यकर्ता जोडत होतो. या दरम्यानच्या काळात आपण मात्र जुन्या जाणत्या लोकांना बाजुला सारत होता. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत पक्षाने आपल्याला मोठी जबाबदारी दिली. घरच्या भाकरी खाऊन कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रचार करून प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून आणले. तालुक्यात एकही दिवस प्रचारासाठी आले नसतांना सामान्य कार्यकर्त्यांने अंगावर घेत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रचार केला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत खासदार पाटील यांचे सर्वात जवळचे व विश्वासू साथीदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीची चर्चा होती. त्यावेळी उन्मेष पाटील हे आपल्या मित्रांसाठी शिफारस करतील असे वाटले होते, पण शिफारस तर दुरच आमदार चव्हाण यांच्या पराभवासाठी अनेक कट कारस्थाने रचली याची चर्चा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात होती. 

आपला विरोध असतांनाही मंगेश चव्हाण हे निवडून आले. काळाच्या प्रवाहात तालुक्यात कधी गटबाजी आणि दुफळी निर्माण झाली, हे आम्हालाही कळाले नाही. आज आपणासह सर्वसामान्य कार्यकर्त्यांला खासदार गटाचा की आमदार गटाचा असे विचारतात. अशा वेळी आम्हाला कमळाचेच म्हणजे भाजपाचे असे उत्तर द्यावे लागते, असे भाजपा शहराध्यक्ष म्हणाले. 

आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहीजे होती. नुकतेच शहरात जे कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले त्यात वेगळे चित्र पहावयास मिळाले. पक्षात जी गटबाजी लपून होती वा फक्त चर्चेत होती,  ती आपण उघड केली. बॅनरवर ना कमळ घेतले ना पक्षाचा प्रोटोकॉल. एवढेच नव्हे तर लसीकरण आयोजनाच्या काही ठिकाणच्या बॅनरवर भाजपाच्या खासदारांसह विरोधी पक्षांच्या काही लोकांचे एकत्रित फोटो होते. यावरून नेमके काय समजायचे? या गोष्टींमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मलाच काय पक्षाच्या एकाही पदाधिकारी तसेच नगरसेवकास विचारात घेतले नाही. 

खरे तर लसीकरणाची सुरूवात आमदार गिरीश महाजन यांनी सर्वप्रथम जामनेरमधून केली. उन्मेष पाटील हे जिल्ह्याचे खासदार असतांना लसीकरण शिबिर फक्त चाळीसगाव तालु्नयातच घेण्याचा उद्देश काय असा सवाल घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे. 

आपण करीत असलेल्या हालचालींमुळे भारतीय जनता पक्षाच्या आपण कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत आहात. सामान्य कार्यकर्ता आपणास चाललेल्या या सर्व प्रकारावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही घृष्णेश्वर पाटील यांनी खासदार पाटील यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रात केल्याने चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणूकीपासून खासदार उन्मेष पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यात धुसफूस सुरु आहे. वेळोवेळी त्याचा प्रत्ययही आला. आता चक्क भाजपा शहराध्यक्षांनीच केलेल्या आरोपामुळे हा संघर्ष अधिकच चव्हाट्यावर आल्याचे बोलले जाते. यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
....
हेही वाचा...

Related Stories

No stories found.