भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण - BJP MLA Ganesh Naik's grandson beaten | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी जात होते. त्याचवेळी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना तळवली गावाजवळून त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. गाडी वळवताना गाडीच्या पाठीमागून येणारा एक दुचाकीस्वार गाडीला येऊन जोरात धडकला.

नवी मुंबई: भाजप आमदार आणि नवी मुंबईचे नेते गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांचा शोध सुरु आहे. माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार गणेश नाईक यांचा नातू संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह मंत्री हे दोघे कृषीकेंद्र शोधण्यासाठी जात होते. त्याचवेळी माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना तळवली गावाजवळून त्यांनी आपली गाडी पुन्हा मागे फिरवली. गाडी वळवताना गाडीच्या पाठीमागून येणारा एक दुचाकीस्वार गाडीला येऊन जोरात धडकला, त्यामुळे तो खाली पडला.

 संकल्प नाईक आणि त्याचा मित्र गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या दुचाकीस्वाराला उचलले. त्याची विचारपूस केली व त्याचे नाव विचारले असता, त्याने प्रविण रघुनाथ लिहे असे  सांगितले. त्याचवेळी जखमी झालेल्या प्रविण यांचा एक साथीदार निलेश जवळच असलेल्या एका हाॅटेलजवळ होता. त्याच्यासोबत त्याचे इतर तीन साथीदारही होते. ते तातडीने अपघातस्थळी पोहोचले व एकूण चौघांनी मिळून संकल्प नाईक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. 

याप्रकरणी निलेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर इतर तिघांचा शोध सुरु आहे. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात 108/2021 भदविस कलम 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत तेजेंद्रसिंग मंत्री यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याची सोनसाखळी गहाळ झाली आहे. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सुहास खरमाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी घडल्याचे सांगितले. दरम्यान, तेजेंद्रसिंग मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टोकावडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख