
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यातील वाद उफाळून आला आहे. यातून काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री व भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. पक्ष नेतृत्वाच्या उद्दामपणामुळे हे संकट आले असून, यात कुठे तरी पाणी मुरतंय, असे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे काही आमदारांसह दिल्लीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की, भाजप त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी राज्यातील भाजपचे नेतृत्व केंद्राच्या इशारानुसार आमदार खरेदीच्या घोडेबाजार करीत आहेत. त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना 10-10 कोटी रूपयांची ऑफर भाजप देत आहे.
याविषयी बोलताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, काँग्रेसमध्ये सध्या जे अराजक माजले आहे त्याला भ्रष्टाचार आणि नेतृत्वाने दाखविलेला उद्दामपणा कारणीभूत आहे. यात कुठेतरी पाणी मुरत आहे. घराणेशाहीच्या गालिच्याखाली पसरलेला भ्रष्टाचार सर्वांना दिसत आहे. भ्रष्टाचाराच्या या व्यापाऱ्यांच्या उद्दामपणामुळे काही तरी संशयास्पद असल्याला खतपाणी मिळत आहे. सोलर प्लँट आणि सोलर पार्क तसेच, प्याज आणि पिझ्झा यातील फरक न कळणारे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत.
राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत हेवेदाव्यांबाबत माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्री बनण्याची इच्छा अनेकांची असते. आमच्या पक्षात पाच ते सात जण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परंतु, जेव्हा पक्ष निर्णयानुसार एक जण मुख्यमंत्री होतो तेव्हा अन्य जण त्याला पाठिंबा देत असतात. आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. सर्व शांतता आहे.
जेव्हा एकाला मुख्यमंत्री केले जाते तेव्हा अन्य इच्छुकांनी शांत बसणे अपेक्षित असते, असे सांगत अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर अशोक गेहलोत हे सचिन पायलट यांना प्रदेश अध्यक्ष व उपमुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा दबाब आणू शकतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. असे झाले तर राजस्थानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलविली होती. ही बैठक दोन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. कारण ते दिल्लीला गेले होते. या बैठकीत मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक मुद्दावर आपले मत मांडले पण सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे बैठकीत अनेक प्रश्न निर्माण केले. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील 22 आमदार हे सध्या दिल्लीत आहेत. हे आमदार पक्षश्रेष्ठींकडे पक्षातील अंतर्गत तक्रारी मांडणार आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.