जयंत पाटलांच्या गाडीत प्रवास केलेल्या भाजप नेत्याने मागितली काँग्रेस नेत्याकडे भेटीची वेळ 

आता त्यांनी निरंजन यांना संधी मिळाली, तर आघाडी ‘खेळ’ करणार नाही, हे बिंबवण्यासाठीचा डाव टाकला आहे.
जयंत पाटलांच्या गाडीत प्रवास केलेल्या भाजप नेत्याने मागितली काँग्रेस नेत्याकडे भेटीची वेळ 
The BJP leader asked for time to meet the Congress leader

सांगली : सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवड ९ सप्टेंबरला (गुरुवारी) होणार आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयाने निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी काम पाहतील. (The BJP leader asked for time to meet the Congress leader)

दरम्यान, गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी आता काँग्रेस पक्षाच्या नेत्या जयश्री पाटील यांनाही भेटीची वेळ मागितली आहे. आवटी यांच्या या गाठीभेटी त्यांचे सुपुत्र निरंजन यांना सभापतीपदाची संधी मिळावी सुरू असल्याची चर्चा आहे. या गाठीभेटींच्या माध्यमातून स्थानिक भाजप नेत्यांवर दबाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाचा तसेच दोन वर्ष पूर्ण झालेल्या आठ सदस्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी भाजपचे सभापती पांडुरंग कोरे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तत्पूर्वी गेल्या महिन्यात स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड महासभेत झाली आहे. या नव्या सदस्यांचा कार्यकाळ ९ सप्टेंबरपासून सुरु होईल. त्याचवेळी नव्या सभापतीची निवड होईल.

महापालिकेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रवादीने महापौरपद मिळवले आहे. आता पालिकेत सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची असली तरी स्थायी समितीवर अजूनही भाजपचे वर्चस्व आहे. १६ पैकी भाजपचे ९ तर काँग्रेसचे ४ आणि राष्ट्रवादीचे ३ सदस्यांचे बलाबल आहे. आता महापौरपदानंतर काँग्रेस आघाडीचे लक्ष्य स्थायीचे सभापतीपद आहे. आता आघाडीच्या डावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील आठवडाभर महापालिकेत यासाठी धुमशान होईल. पुन्हा एकदा पक्षांकडून व्हिप बजावले जाणार आहे.

आघाडीच्या माध्यमातून आवटींनी टाकला भाजप नेत्यांना डाव

भाजपकडून सभापतिपदासाठी निरंजन आवटी, जगन्नाथ ठोकळे, सविता मदने यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांचे अन्य एक सुपुत्र संदीप यांना यापूर्वी सभापतिपदाची संधी भाजपने दिली होती. तरीही भाजपने पुन्हा निरंजन यांना स्थायीत आणण्यासाठी त्यांनी थेट भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वालाच साकडे घालत स्थानिक नेत्यांना वश केले होते. आता त्यांनी निरंजन यांना संधी मिळाली, तर आघाडी ‘खेळ’ करणार नाही, हे बिंबवण्यासाठीचा डाव टाकला आहे. स्थानिक भाजप नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी गेल्या आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भेट घेत चुणूक दाखवली आहे. त्यांनी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांची भेट मागितली आहे.

आता जबाबदारी काँग्रेसची; राष्ट्रवादी सोबतीला

महापौर निवडीवेळी झालेल्या चर्चेनुसार या वेळी सभापतीपदासाठी काँग्रेसचाच उमेदवार असेल. मात्र त्यासाठीच्या ‘जुळणी’ जबाबदारीही काँग्रेसवर असेल. राष्ट्रवादी फक्त सोबतीला असेल. काँग्रेसकडून फिरोज पठाण आणि करण जामदार असे दोघेही इच्छुक आहेत. सध्या आघाडी भाजपअंतर्गत हालचालीवर लक्ष ठेवून आहे. भाजपमधून सिग्नल मिळाला तर नक्की प्रयत्न करू, असे काँग्रेस गोटातून सांगण्यात आले आहे. सभापतिपदाचे गणित अवघड आहे. मात्र, अशक्य नाही, असा काँग्रेसचा पवित्रा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.