लस बनवणाऱ्या भारत बायोटेकमधील ५० जणांना कोरोनाचा संसर्ग 

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
 Bharat Biotechs 50 employees are off work due to covid
Bharat Biotechs 50 employees are off work due to covid

हैदराबाद : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. भारत बायोटेकसह सिरम इन्स्टिट्युटनेही लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा दावा केलेला नाही. भारत बायोटेकलाही कोरोनाचा फटका बसला असून कंपनीतील ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तरीही कंपनीकडून कोणताही खंड न पडू देता २४ तास लस उत्पादनाचे काम सुरू आहे. 

देशात १८ वर्षापुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाल्यानंतर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोव्हॅक्सिन लशीचे पुरेसे डोस नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी आलेले डोस आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना दिले जाणार आहेत. दिल्ली व इतर राज्यांमध्ये लशीचा तुटवडा असल्याने अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. तर लस उपलब्ध असलेल्या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड उत्पादन इतर कंपन्यांना करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी त्यावर 'वेदनादायी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून कंपनीने १० तारखेला राज्यांना वितरीत केलेल्या लशींची माहिती दिली आहे. 

'काही राज्य आमच्या हेतुविषयी तक्रार करत आहेत. आमचे ५० कर्मचारी सध्या कोरोनामुळे काम करू शकत नाहीत. तरीही आम्ही भारतीयांसाठी २४ तास कार्यरत आहोत,' असे एला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी दोन दिवसांपूर्वी लशीचा पुरवठा केलेल्या १८ राज्यांची यादीही जोडली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांचा समावेश आहे. 

लवकरच २ ते १८ वयोगटातील मुलांनाही मिळणार लस

भारत बायोटेकनेही २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार केली आहे. या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी या लशीच्या चाचण्या पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या चाचण्यांना सेंट्रल ड्रग्ज स्टॅन्डर्ड अॅार्गनायझेशन (CDSCO) च्या कोविड-१९ तज्ज्ञ समितीने मान्यता दिली आहे. या चाचण्या दिल्ली व पाटणातील AIIMS सह नागपूरमधील ५२५ स्वयंसेवकांवर होणार आहेत. 

या चाचण्यांमध्ये लशीची परिणामकारकता, सुरक्षितता, प्रतिकारशक्ती तपासली जाईल. चाचणीचा तिसरा टप्पा सुरू करण्यापूर्वी भारत बायोटेकला दुसऱ्या टप्प्यातील सविस्तर अहवाल तज्ज्ञ समितीकडे सादर करावा लागणार आहे. या टप्प्यातील सुरक्षिततेवर पुढील टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली जाईल, असे सुत्रांनी सांगितले. सध्या अमेरिका व कॅनडा या देशांमध्ये १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in