
शिर्डी : ‘‘कधी अंडरपँटवर पोलिस गाडीत बसलो, कधी राहिलो दीड- दीड महिना तुरुंगात. कुणी फेकला एक दगड, तर मी भिरकावले दोन. अरे ला कारे हे तर माझे जीवनसूत्र. पंधरा वर्षे विधानसभा गाजविली. पस्तीस वर्षे साखर कारखाना उत्तम चालवीत शेतकऱ्यांना भाव दिला. माघार घेणे नाही मला ठाव. वय वर्षे ८० असले, तरी आजही तोच जोष आणि अंगात रग आहे. राजकारणाच्या आखाड्यातील कुस्तीचा शौक तसा फार जुना आहे...’’ अशा आपल्या खास शैलीत श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी भंडारदऱ्याच्या बहुचर्चित कुस्तीच्या पार्श्वभूमीवर आपले मनोगत उलगडले. (Murkute's political chemistry! He wants to swim in Bhandardara dam in 80 years)
मुरकुटे यांनी नगर जिल्ह्यातील प्रस्थापित साखरसम्राटांच्या राजकीय आखाड्यात स्वतःचा असा ग्रामीण बाज असलेला वेगळा प्रवाह निर्माण केला. त्याला शिवराळ भाषेतील टीकेची झालर लावली. दंड थोपटीत श्रीरामपूरच्या गांधी मैदानात प्रतिस्पर्ध्याला कुस्ती खेळण्याचे आव्हान देणारे, सकाळी फिरायला जाताना रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीसाठी बसलेल्यांना चोप देणारे, काळा पोशाख आणि बांगड्यांसह प्रवेश करीत विधानसभा गाजविणारे, मतदारसंघात बंधाऱ्यांची मालिका उभी करणारे, अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बारा-पंधरा लाख मेट्रिक टन ऊस उभा करणारे, विरोधकांवर शिवराळ भाषेत टीकेची राळ उडविणारे, वेळप्रसंगी हाणामारी करणारे, जलपूजन आटोपताच खोल बंधाऱ्यात उडी टाकत उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविणारे, अशी मुरकुटे यांची विविध रूपे नगर जिल्ह्याने आणि काही प्रसंगात महाराष्ट्राने पाहिली आहेत.
याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘‘एकदा संबंध नसलेल्या मारामारीत मला पोलिसांनी आरोपी केले. घरी अटक करायला आले, तर मी अंघोळीसाठी चाललो होते. त्यांना वेळ नसल्याने तसाच पोलिस गाडीत बसलो. पाच-दहा हजार समर्थक जमले. राहात्याच्या विश्रामगृहावर माजी मंत्री शंकरराव कोल्हे हे माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले. डॉ. के. वाय. गाडेकर नवे कपडे घेऊन आले. माझे अंडरपॅन्टमधील फोटो राज्यभरातील वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले. एकदा खोट्या गुन्ह्यात अडकविले. मी जामीन नाकारला. दीड महिना तुरुंगात राहिलो. अखेर गुन्हा मागे घेण्यात आला. नित्याचा राजकीय संघर्ष, हाणामाऱ्या, आंदोलने, तुरुंगवास माझ्या पाचवीला पुजला होता. आंदोलने करून शेकडो कार्यकर्त्यांसह तुरुंगात जायचो. माघार, दिलजमाई आणि जामीन वगैरे भानगड नाही. हजार- पाचशे कार्यकर्त्यांसमवेत सायकलवरून विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जायचो.
इंदोरीकर महाराज हे कीर्तनाच्या प्रांतातील मुरकुटे आहेत की मुरकुटे हे राजकारणातील इंदोरीकर आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना मुरकुटे म्हणाले, ‘‘तुम्हाला काय समजायचे ते समजा. लोक माझ्या भाषणाला पोट दुखेपर्यंत हसतात. भानुदास महाराज की जय, असा जयघोषदेखील करतात. मी महाराजच आहे ना मग. फार तर राजकारणातला भानुदास महाराज म्हणा. हे पंचवीस-तीस वर्षांपासून सुरू आहे. विधिमंडळातही मी बोलायला उभा राहिलो की सर्वांना हसू फुटायचे.’’
हेही वाचा..
आपण चार्टर्ड अकाउंटंट आहात. मात्र भाषणात अस्सल गावरान भाषेत विरोधकांचा उद्धार करता. कधी कधी कमरेखाली वार करता, हे जरा मिसमॅच होते, असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना मुरकुटे म्हणाले, ‘‘दादा कोंडकेंच्या पिक्चरला नावे ठेवणारे पहिल्याच ‘शो’ला गर्दी करायचे. दादा कुठे मिसमॅच झाले तर सदैव मॅन ऑफ दी मॅच होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री रामराव आदिक, गोविंदराव आदिक, माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील, तिकडे नेवाशाचे यशवंतराव गडाख, अशा प्रस्थापितांविरुद्ध मला लढावे लागले. इंदिरा गांधी, वसंतदादा पाटील, माजी आमदार भास्करराव गलांडे आणि आजोबा काशिनाथ मुरकुटे यांना मी फार मानतो. शाळेत पाटी-पुस्तकाला पैसे नसायचे. (कै.) भास्करराव गलांडे यांनी मदतीचा हात दिल्याने चार्टर्ड अकाउंटंट झालो. शेतीचे पाणी हे माझे दैवत आहे.’’
त्यांना भंडारदऱ्यात पोहायचेय
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ८०व्या वर्षात पदार्पण केले आहे. दिनचर्येविषयी ते सांगतात... सकाळी साडेपाचला उठतो. तासभर चालणे व सायकलिंग, तासभर व्हॉलिबॉल खेळतो. अर्धा तास योग व प्राणायाम आणि अर्धा तास जिम, हा नित्याचा दिनक्रम आहे. मोबाईल सांभाळणारा स्वीय सहायक, स्वतंत्र केबिन, असा थाटमाट मान्य नाही. लोकांत राहणे आणि लोकांत बसणे, हा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. भंडारदरा धरणात उडी टाकून तासभर पोहण्याची इच्छा आहे.
हेही वाचा..
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.