अभिनेते कमल हासन यांच्या गाडीवर चाहत्याचाच हल्ला.. - Attack on Kamal hasan's car | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेते कमल हासन यांच्या गाडीवर चाहत्याचाच हल्ला..

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

पाहा कुठे झाला हल्ला...

तामिळनाडू: तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान कांचीपूरम भागात प्रख्यात अभिनेते व मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला. एका व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली असून रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. 

कांचीपुरममध्ये प्रचारानंतर हासन आपल्या हाॅटेलकडे जात असताना एका तरुणाने त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणारा तरूण हा कमल हासन यांचा चाहता असल्याचेही समोर आले आहे. एमएनएम पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार हासन यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे, परंतु हासन यांना कोणतीही इजा झालेली नाही. हासन यांच्या गाडीचा दरवाजा आरोपीने जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्याचेही उजेडात आले आहे. 

तेथे उपस्थित असणाऱ्यांनी आरोपी तरुणाला पकडले व पोलिसांच्या ताब्यातही दिले. मद्याच्या अंमलाखाली आरोपीने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, एमएनएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडत त्याची चांगलीच धुलाई केली. आरोपीला पोलिसांनी त्यानंतर ताब्यात घेत त्याला उपचारासाठी व तपासणीसाठी रुग्णालयात नेले. 

हासन यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र हासन यांना कोणतीही इजा झाली नसल्याची वार्ता मिळाल्याने चाहत्यांनी व पाठीराख्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मक्कल निधी मय्यम पक्षाने १५४ मतदारसंघातून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. खुद्द कमल हासन कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख