भाजपतून आलेल्या शिवलेंना उपसभापती करून अशोक पवारांनी शब्द पाळला 

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत शिरूर-आंबेगाव व शिरूर-हवेली असा विभागीय समतोल साधण्यात बाजी मारताना आमदारअ‍ॅड. अशोक पवार यांनी दिलेल्या शब्दाची बूज राखत आज (ता. २४ जुलै) विकास आबा शिवले यांना उपसभापतिपदाची संधी दिली.
भाजपतून आलेल्या शिवलेंना उपसभापती करून अशोक पवारांनी शब्द पाळला 
Ashok Pawar kept his word by appointing Shivale as Deputy Sabhapati

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत शिरूर-आंबेगाव व शिरूर-हवेली असा विभागीय समतोल साधण्यात बाजी मारताना आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी दिलेल्या शब्दाची बूज राखत आज (ता. २४ जुलै) विकास आबा शिवले यांना उपसभापतिपदाची संधी दिली. 

बाजार समितीच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवले हे भाजप पुरस्कृत पॅनेलमधून निवडून आले होते. तथापि, आमदार पवार यांच्या विकासाच्या भूमिकेला पाठबळ म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवणुकीत पक्षासाठी नेटाने काम करीत आमदार पवार यांच्या विजयी मताधिक्क्यात मोलाचा वाटा उचलला. अशोक पवार यांनी याची जाण ठेवली. राजकारणात दिलेला शब्द शक्यतो पाळण्यासाठी नसतो, असे सर्वसाधारण राजकीय वातावरण असताना शिवले यांच्या भूमिकेची राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी जाण ठेवली आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना उपसभापतीपद बहाल केले. या ना त्या कारणाने सभापती-उपसभापतिपदाची निवड लांबत गेल्याने गेले वर्षभर हे पद त्यांना गुंगारा देत होते. आज अखेर उपसभापतीवर ते विराजमान झाले. 

शशिकांत दसगुडे यांच्या राजीनाम्यावेळी खरेतर उपसभापती विश्वास ढमढेरे यांचाही राजीनामा अपेक्षित होता. मात्र, आमदार पवार यांनी चाणाक्षपणे दोन्ही पदांचे राजीनामे न घेता शिरूर-आंबेगाव हा विभागाचा मुद्दा निकालात काढण्यासाठी त्यावेळी केवळ सभापतींचा राजीनाम घेतला. मात्र, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व आमदार अशोक पवार यांच्यात झालेल्या चर्चेतून त्या पदावर शंकर जांभळकर यांची वर्णी लागली. सभापतीपद आंबेगाव मतदार संघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ३९ गावांतून निवडून आलेले असल्याने उपसभापतीपद शिरूर भागाला मिळणार, हे निश्चित होते. 

उपसभापती पदासाठी विकास शिवले यांच्यासह विजेंद्र गद्रे, सतीश कोळपे यांच्या नावाचीही चर्चा होती. आमदार पवार यांना वेगवेगळी राजकीय शिष्टमंडळे भेटून उपसभापती निवडीबाबत बराच खल झाला होता. परंतु, विकास शिवले यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची अशोक पवार यांनी बूज राखली आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांना उपसभापतिपद देण्याचा निर्णय घेतला.

अशोक पवार यांनी याबाबत इच्छुकांबरोबरच सर्व संचालकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर तालुक्याच्या राजकारणावर संपूर्ण कमांड निर्माण केलेल्या आमदार पवार यांच्या मनातील विकासाची भूमिका लक्षात येताच इतरांनी तलवारी म्यान करीत एकमुखाने शिवले यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला. 

उपसभापतीपदाच्या निवडीसाठी आज बाजार समितीच्या संचालकांची विशेष सभा झाली. या वेळी त्या पदासाठी शिवले यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी जाहीर केले. या निवडीनंतर शिवले यांनी बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे व प्रकाश पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांची विकासाची भूमिका समाजाला पुढे नेणारी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. केलेल्या कामाची आमदार पवार यांनी जाण ठेवली आणि शब्द देऊन योग्य संधी दिल्याबद्दल त्यांचे आणि सभापती जांभळकर यांच्यासह सर्व संचालकांचे आभार मानतो, असे नवनिर्वाचीत उपसभापती विकास आबा शिवले यांनी सांगितले.

Edited By Vijay Dudhale

Related Stories

No stories found.