सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू : राणेंच्या अटकेवरून शेलारांचा सरकारला इशारा 

राज्य सरकार झुंडशाही करणार असेल तर आम्ही तांडव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू : राणेंच्या अटकेवरून शेलारांचा सरकारला इशारा 
Ashish Shelar warns government over Narayan Rane's arrest

इंदापूर/बावडा (जि. पुणे)  ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक ही राज्य सरकारच्या झुंडशाहीचे लक्षण आहे. राज्य सरकारने आता सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा शेवट आम्हीच करू, असा इशारा देत सरकारच्या तुघलकी कार्यपद्धतीचा निषेध व धिक्कार आहे. राज्य सरकारची झुंडशाही व महाराष्ट्र पोलिसांचा गैरकारभार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पक्षप्रतोद तथा आमदार आशिष शेलार यांनी दिला. (Ashish Shelar warns government over Narayan Rane's arrest)

इंदापूर तालुक्यातील बावडा येथील शहाजीनगर येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेलार बोलत होते. या वेळी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, संचालक राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, विलास वाघमोडे, मारुतराव वणवे, माऊली चवरे, ऍड शरद जामदार, गजानन वाकसे, कृष्णाजी यादव उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एका सध्या क्लिपवरून नारायण राणे यांना अटक करत असेल तर आमच्याकडे तीन तासांचा सिनेमा होईल, इतक्या सीडी आहेत. नारायण राणे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असे सांगूनसुद्धा त्यांना अटक करण्यात आली. राज्य सरकार झुंडशाही करणार असेल तर आम्ही तांडव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.  त्यांनी हा तमाशा बंद केला नाही तर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची क्लिप बाहेर काढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर काठ्या मारल्या पाहिजेत, हे काँग्रेस नेते राहुल गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जोड्याने मारले पाहिजे, हे वक्तव्य आम्ही सहन केले. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबतवक्तव्य करताना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. त्यावर पडदा पडल्यानंतर झालेली कारवाई चुकीची आहे, असा दावाही शेलार यांनी केला. 

माजी मंत्री शेलार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांस देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे का अमृत महोत्सव आहे, हे समजत नाही. विरोधी देशास आनंद वाटावा, असे वक्तव्य करणे हे देश विरोधात कृत्य आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील, अशी झुंडशाही या सरकारची आहे. त्यामुळे आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. 

राज्यातील सहकार सर्वसमावेशक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत सहकाराच्या मूळ प्रेरणेस धक्का बसत आहे, शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळत नाही, सहकारीऐवजी खासगी कारखाने उभे राहून कारखानदारांचे इमले उभे राहत आहेत. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर शेतकरी आत्महत्या करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सहकारास गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी अमित शहा हे केंद्रीय सहकार मंत्री झाले आहेत. त्यास गती देण्याचे काम राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील करत आहेत, त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय भवितव्य उज्वल आहे, असेही सूतोवाच त्यांनी शेवटी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in