माऊलींचा मुलगा लाचखोरीत गुंतल्याचे ऐकताच शरद पवारांनी व्यक्त केली हळहळ

पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रश्नी शहरातील ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे व पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी बारामतीला जाऊन पवार यांची भेट घेतली.
माऊलींचा मुलगा लाचखोरीत गुंतल्याचे ऐकताच शरद पवारांनी व्यक्त केली हळहळ
Sharad Pawar, Anna Bansode, Vilas Lande, .jpg

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाचखोरी प्रकरणात माऊलींचा मुलगा आरोपी असल्याचे समजताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता.२१) आश्चर्य आणि हळहळही व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडचे स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांचे वडिल हे पवारांच्या निकटचे असल्याने त्यांचा मुलगा या प्रकरणात गुंतल्याचे ऐकून त्यांना दुख: झाले. (Anna Bansode and Vilas Lande met Sharad Pawar) 

पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रश्नी शहरातील ज्येष्ठ नेते आणि भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे व पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी बारामतीला जाऊन पवार यांची भेट घेतली. सहा महिन्यांवर आलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या भेटीतून राष्ट्रवादीने या निवडणुकीची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे. या भेटीत लांडे यांनी नुकत्याच (ता.१८) पिंपरी पालिकेत पडलेल्या एसीबीच्या धाडीची व त्यात अटक झालेले अॅड लांडगे यांच्याबद्दल माहिती दिली. त्यावेळी नितीन हे तत्कालीन हवेली मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचा मुलगा असल्याचे सांगताच माऊलींचा मुलगा? असे आश्चर्य त्यांनी व्यक्त केले.

एका ठेकेदाराच्या मंजूर झालेल्या चार निविदांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी निविदा रकमेच्या तीन टक्के म्हणजे दहा लाख रुपये लांडगे व स्थायीतील चार कर्मचाऱ्यांनी लाच म्हणून मागितले होते. नंतर दोन टक्यांवर तडजोड होऊन त्यातील पहिला हफ्ता म्हणून त्यांनी एक लाख १८ हजार रुपये स्वीकारले होते. त्या गुन्ह्यात हे सर्व पाचही आरोपी उद्यापर्यंत (ता.२३) पोलिस कोठडीत आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडसाठी वेळ देऊ, असे पवार यांनी मान्य केल्याचे लांडे यांनी या भेटीनंतर 'सरकारनामा'ला सांगितले. शक्य झाले, तर येत्या १५ दिवसांत ते शहरात येऊ शकतात, असे लांडे म्हणाले. पिंपरी रेल्वे स्टेशनलगतची मिलीटरी डेरी फार्मची वापरात नसलेली पडीक जागा रेल्वे प्रशासनाला देऊन त्या ठिकाणी सुसज्ज असे रेल्वे जंक्शन करण्याची मागणी लांडे व बनसोडे यांनी यावेळी केली. कारण सध्या रेल्वे प्रवाशांना पिंपरी चिंचवडहून पुणे स्टेशन येथे जाऊन आपली गाडी पकडावी लागते. अथवा येत असल्यास पुणे येथे उतरून पुनः शहरांकडे उलटा प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा वाया जातो आहे.त्याची जंक्शन झाल्यावर बचत होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पिंपरीत, दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीएमई) बोपखेल गावात जाणारा रस्ता लष्कराने बंद केल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे बोपखेलवासियांसाठी खडकीला जोडणारा पूल बांधण्याचे ५० कोटी रुपये खर्चाचे काम पिंपरी पालिकेने हाती घेतले आहे. ते ३० ते ४० टक्के पूर्णही झाले आहे. मात्र, पुढील काम केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे  सध्या बंद आहे. लष्कर हद्दीत परवानगी नसल्याने ते बंद पडले आहे. संरक्षण विभागाकडून ती मिळावी यासाठी त्यात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

याबरोबरच शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकराची टांगती तलवार, भाजपचा सावळा कारभार, ते करीत असलेल्या नागरिकांच्या पैशांची लूट आदी मुद्देही आजी - माजी आमदारांनी पवार यांच्यासमोर मांडले. त्यावर मी स्वतः शहरासाठी वेळ देईन असे आश्वासन पवरांनी दिल्याचे आमदार बनसोडे व लांडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.