शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे 40 कुटुंबांना पाण्याचा वेढा

डोंगरभागांत चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी, नाल्यांत झेपावले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे.
शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे 40 कुटुंबांना पाण्याचा वेढा
shevgoan.jpg

अहमदनगर ः अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सलग तीन दिवस पावसाची आशंका हवामान विभागाने वर्तविली होती. त्यातील पहिल्या दोन दिवसांत पाऊस न झाल्याने नागरिक निश्चिंत होते. मात्र काल रात्रीपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू झाला. डोंगरभागांत पावसाचे प्रमाण अधिक होते.

डोंगरभागांत चांगला पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी, नाल्यांत झेपावले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पूर स्थितीसाठी पुरेशा बोटी नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागासमोरही मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा...

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव या गावांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याने शिरकाव केला आहे. या तीनही नद्यांचा संगम वरूर गावात होतो. तेथे तर हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असा गावाचा परिसरात नदीचे पाणी पोचले आहे. नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आहे.

पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे आखेगाव येथील २५ कुटूंब तर वरूर येथील म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले  आहेत. काहींची तर जनावरे वाहून गेली. ही सर्व कुटुंब भयभीत झाली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 
शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पुलावरून चाललेली ट्रक पाण्यात बंद पडली आहे. त्यात एक जण अडकला आहे. सर्व पिके पाण्यात गेली असून घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे. 

अखेर त्याचा वाचविला प्राण
ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथील भगिरथी नदीवरील पुलावर पहाटे तीन ते चारच्या सुमारास पुला वरून पाणी जात होते. अशा स्थितीत एकाने या पुलावरून ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा ट्रॅक्टर अडकला. पुराचे पाणी ट्रॅक्टरच्या वर आले. त्याने ग्रामस्थांकडे मदतीची याचना केली. तो सकाळी साडेआठ वाजेपर्यंत टॅक्टरवरच उभा होता. अखेर सकाळी ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले.


हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठी राहु नये. उंच टेकडी व घरावरती जावून रहावे. पाण्यात अडकलेल्या जनावरांना मोकले सोडून द्यावे.
- अर्चना भाकड-पागिरे, तहसीलदार, शेवगाव.

सीना नदीला पूर

अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीलाही पूर आला आहे. नदीचे पाणी नगर-कल्याण रस्त्यावरील पुलावरून वाहत आहे.

Related Stories

No stories found.