अमित शहा चंद्रकांतदादांना नाही भेटले... पण या दोन पाटलांना आवर्जून वेळ दिला!

चंद्रकांतदादांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा चांगलाच गाजला..
अमित शहा चंद्रकांतदादांना नाही भेटले... पण या दोन पाटलांना आवर्जून वेळ दिला!
Amit Shah-Vikhe-Harshwardhan

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaj) यांचे निकटवर्तीय आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात त्यांना अमित शहांनी भेट न दिल्याची चर्चा थांबण्याच्या आधीच अमित शहांची दुसरी भेट गाजू लागली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrish Vikhe Patil) आणि हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) या दोघांशीही भेटून शहा यांनी चर्चा केली. चंद्रकांतदादांना टाळले आणि या दोन पाटलांना शहा भेटले, असे या निमित्ताने घडल्याचे दिसून आले आहे. (Vikhe Patil and Harshwardhan meet Amit Shah)

भाजपाच्या राज्यातील विविध नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे, जयकुमार रावल, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदींचा समावेश होता. या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, नारायण राणे आदिंच्या भेटीगाठी घेतल्या. 

या दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपद काढणार याचीही चर्चा जोरदार रंगली होती. या चर्चांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांवर तोंडसुख घेत, असा कोणताही निर्णय आणि बदल होणार नसून,पतंगबाजी कमी करण्याचा सल्ला देत, बातम्या कमी पडल्यातर मला सांगा असाही चिमटा काढला होता. असे असले तरी चंद्रकांतदादांच्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांची अमित शहांशी भेट होऊ शकली नाही. त्यावरूनही माध्यमांत चर्चा सुरू झाली. या चर्चेवर पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याच्या चोवीस तास आधीच शहांनी महाराष्ट्रातील इतर दोन पाटलांची भेट घेतली. बातम्या कमी पडल्या म्हणून माझी व शहांची भेट झाली नाही, अशी बातमी दिली असावी असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. त्यांनी असा दावा केला असला तरी या दोन पाटलांना लगेच भेटीची वेळ मिळाल्याचे अनेकांच्या नजरेतून सुटले नाही.  

विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना बुधवारी (ता.10) देशाचे पहिले सहकारमंत्री म्हणून अमित शहा यांची भेट घेतली. दोघे सहकारातील दिग्गज नेते आहेत. हर्षवर्धन यांनी सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रात कामही पाहिले आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर या वेळी चर्चा झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कट्टर विरोधक म्हणून या नेत्यांकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीचे सहकारावर वर्चस्व आहे. तसेच भाजपमध्ये असलेल्या काही नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरही काही बाबी शहांच्या कानावर घातल्या असाव्यात, असे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in