कार्यकर्त्यांनी गटातटाच्या फंदात पडू नये: अजित पवार  - Activists should not fall into the trap of gangsterism | Politics Marathi News - Sarkarnama

कार्यकर्त्यांनी गटातटाच्या फंदात पडू नये: अजित पवार 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. आमदार भारत भालके यांनी पंढरपूर मतदार संघात चांगले काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे, असे अजित पवार म्हणाले.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेचे सर्व तपशील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर शरद पवार हे लवकरच  पोट निवडणुकीतील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. जनतेच्या मनात जो उमेदवार असेल, तोच दिला जाईल. पक्षाने उमेदवारी जाहीर केली. ती जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गटातटाच्या फंदात न पडता उमेदवार निवडून आणावा, असा सज्जड दम वजा इशारा अजित पवार यांनी दिला. 

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीदरम्यान अजित पवार व जयंत पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी बंद खोलीत चर्चा केली. आमदार भारत भालके यांनी पंढरपूर मतदार संघात चांगले काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली.   

दरम्यान, अजित पवार यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाविषयी पत्रकारांशी  एक चकार शब्दही न बोलता काढता पाय घेतला. त्यामुळे पत्रकार काहीसे नाखुश दिसले. निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून परमबीर सिंह (Parambirsingh) यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यांवरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख