मुळशीत वादळामुळे 2200 घरांची पडझड 

निसर्ग चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्‍यातील सुमारे 2200 छोट्या मोठ्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे 500 पेक्षा जास्त विजेचे खांब कोलमडल्याने निम्मा तालुका दोन दिवसांपासून अंधारात आहे.
मुळशीत वादळामुळे 2200 घरांची पडझड 
2200 houses collapsed due to storm in Mulshi taluka

पौड : निसर्ग चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्‍यातील सुमारे 2200 छोट्या मोठ्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुमारे 500 पेक्षा जास्त विजेचे खांब कोलमडल्याने निम्मा तालुका दोन दिवसांपासून अंधारात आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. या आपत्तीत तालुक्‍यातील 1100 पेक्षा जास्त कच्च्या घरांचे पूर्णत:, तर 100 पेक्षा जास्त पक्‍क्‍या घरांचे अंशत: नुकसान झाले आहेत, तर 1000 पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त झाल्या आहेत. 

मुळशी धरण परिसरातील कोकण घाटमाथ्यावरील अनेक गावांतील घरांची पडझड झाली. झाडे आणि विजेचे खांब पडले. तालुक्‍यातील विविध गावांतील पाचशेपेक्षा जास्त खांब पडल्याने निम्म्यापेक्षा जादा गावे अंधारात आहेत. 

आमदार थोपटे यांनी तालुक्‍यातील काही गावांना भेट दिली. या वेळी तहसीलदार अभय चव्हाण, महावितरणचे अभियंता के. के. फड, गटविकास अधिकारी संदीप जठार, नायब तहसीलदार भगवान पाटील, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नीलेश दगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश वाशिवले, मधुर दाभाडे, विजय मिरकुटे, नीलेश सुर्वे उपस्थित होते.

नुकसानग्रस्त घर, शेती आणि झाडांचे तातडीने योग्य पंचनामे करावेत, वीजव्यवस्था पूर्ववत सुरु करावी, अशा सूचना महसूल आणि महावितरण प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 


नसरापूर परिसरात पॉलिहाउसचे नुकसान 

नसरापूर : निसर्ग वादळामुळे नसरापूर (ता. भोर) परिसरातील अनेक गावांत झाडे, वीजखांब पडले आहेत. घराचे पत्रे उडून भिंतीही पडल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या पॉलिहाउसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

हातवे खुर्द येथील देऊळवाडी येथील जुन्या शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत, तर हातवे बुद्रुक येथील मारुती सणस यांच्या घरावर झाड पडले आहे. तांभाड येथे घराचे छप्पर उडून गेले आहे, तर एका गोठ्यावर झाड पडल्याने गोठ्याचे नुकसान झाले आहे.

हातवे सणसवाडी येथील चांगुणाबाई मांढरे यांचे घर पडले असून विजेचे खांब वाकले आहेत. पारवडी येथे राजाराम सोपाना लिमण व काळुराम निवृत्ती लिमण यांच्या घरावरील पत्रे व कौलाचे नुकसान झाले आहे.

कुरंगवडी येथे जगन्नाथ काटे यांच्या घरावरील तसेच बायडाबाई कचरे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. पोपटराव साहेबराव शिळीमकर यांच्या घराचे छत उडून भिंती पडल्या आहेत. 

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घर आणि शेताचे पंचनामे करून घेण्यासंदर्भात तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये; अफवांवर विश्वास ठेऊ नये. 
-संग्राम थोपटे, आमदार 

Related Stories

No stories found.