बारावीत दोनदा नापास...तरीही न खचता झाले आयपीएस... - What is the success story of Anil Pasarkar | Politics Marathi News - Sarkarnama

बारावीत दोनदा नापास...तरीही न खचता झाले आयपीएस...

उमेश घोंगडे
शुक्रवार, 17 जुलै 2020

पारसकर हे दोनदा बारावीच्या परीक्षेत नापास झाले, तरीही ते खचले नाही, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळवलं.. अन् आयपीएस होण्याचे स्वप्न साकारलं.

पुणे : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे... हे वापरून गुळगुळीत झालेले वाक्य. पण अनिल पारसकर यांच्याबाबत हे वाक्य परत परत उच्चारावे, असे वाटते...कालच बारावीचा निकाल लागला आहे.  यात अपयशी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची सक्सेस स्टोरी नक्कीचं प्रेरणादायी ठरेल. पारसकर यांना अपयशाशी एकदा नव्हे, दोनदा सामना करावा लागला होता.

कमी गुण मिळाले किंवा नापास झालो, किंवा करिअरमध्ये अपयश आले म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या बातम्या आपल्याला निकाल लागल्यावर वाचायला मिळतात.  पण, एका परीक्षेतील अपयश तुमचं करिअर ठरवू शकतं नाही.  कोणत्याही विद्यार्थ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आयपीएस अनिल पासरकर यांची प्रेरणादायी स्टोरी माहिती करून घ्यावी.  पारसकर हे दोनदा बारावीच्या परीक्षेत नापास झाले, तरीही ते खचले नाही, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळवलं.. अन् आयपीएस होण्याचे स्वप्न साकारलं. काय आहे अनिल पासरकरांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊयात.

"एका परीक्षेतील अपयश तुमचे करिअर ठरवत नाही... त्यामुळे परीक्षेतील तत्कालिक अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने पुढच्या यशाची तयारी करा," असा सल्ला भारतीय पोलीस सेवेतील आधिकारी (आयपीएस) रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिला आहे. काल बारावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारसकर यांचा सल्ला केवळ महत्वपूर्ण नाही तर कठीण परिस्थितीतून पारसकर यांनी मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

यशस्वी झालेले विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आयुष्यात आधी आलेल्या अपयशाची माहिती शक्यतो होऊ देत नाहीत.  मात्र, पारसकर याला अपवाद आहेत. बारावीत आपण स्वत: दोनदा नापास झालो होतो. मात्र, त्या अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने यशप्राप्तीसाठी झगडलो, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. त्यामुळे परीक्षांमधील अपयश तात्पुरते असते. त्यातून आयुष्याचे यशापयश ठरत नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पारसकर यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. बारावी सायन्सला त्यांना गणित विषय अवघड जात होता. या विषयात ते दोनदा नापास झाले. मात्र, प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांनी शेवटी गणितात यश मिळविले. 

विशेष म्हणजे बारावी उत्तीर्ण होणारे पारसकर हे त्यांच्या घरातील एकमेव होते. बारावीनंतर आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन ते पुण्यात आले. आई-वडीलांनी त्यांच्या स्वप्नाला पाठबळ दिले. पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात बीएसस्सीला प्रवेश घेतला. बीएसस्सीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. यूपीएससीच्या तिसऱ्या प्रयत्नात पारसकर यांची आयपीएससाठी निवड झाली. यूपीएससीच्या परीक्षेतील यशानंतर पारसकर हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांच्या गळ्यातील ताईत असून अनेकांचे प्रेरणास्त्रोत आहेत.

जोमाने पुन्हा तयारी करा....पारसकर

पारसकर म्हणाले, ‘कोणाच्याही आयुष्यात जे ठरवतो ते होतेच असे नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील अपयशाने खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा तयारी करायला हवी. प्रत्येकाला अभ्यासाची आवड असतेच असे नाही. विविध प्रकारचे खेळ, चित्रकला, संगीत अशा विविध क्षेत्रात प्रत्येकाची वेगवेगळी आवड असू शकते. अभ्यासाच्या दडपणाखाली पालक बऱ्याचवेळा आपल्या मुलांच्या या छंदांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतााना दिसत नाहीत. मुळात पालकांनी हा दृष्टीकोन बदलायला हवा. परीक्षेत मिळालेले गुण म्हणजेच आयुष्यातील यश असते ही मानसिकता मुळात बदलायला हवी.’
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख