‘हट ऑफ रिमेम्बरन्स’मध्ये शहीद संतोष बाबू ... - Martyr Santosh Babu in ‘Hut of Remembrance’ | Politics Marathi News - Sarkarnama

‘हट ऑफ रिमेम्बरन्स’मध्ये शहीद संतोष बाबू ...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

कर्नल संतोष बाबू यांच्या बलिदानाची दखल घेत, 'हट ऑफ रिमेम्बरन्स' या प्रबोधिकेतील शहीद योद्धयाच्या स्मारकात कर्नल बाबू यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

पुणे : लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनाबरोबर झालेल्या संघर्षात शहिद झालेले कर्नल संतोष बाबू पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनेचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी शनिवारी पुष्पचक्र अर्पण करून संतोष बाबू यांना आदरांजली वाहिली. कर्नल संतोष बाबू यांच्या बलिदानाची दखल घेत, 'हट ऑफ रिमेम्बरन्स' या प्रबोधिकेतील शहीद योद्धयाच्या स्मारकात कर्नल बाबू यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

१५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्यात कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश होता. गलवानमधील भारत-चीन सिमेवर गस्त घालताना ही चकमक झाली होती. गस्त घालणाऱ्या या भारतीय तुकडीचे नेतृत्व कर्नल संतोष बाबू करीत होते.

सीमेवर झालेल्या या संघर्षात वीस जवान शहीद झाल्यानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएने आपल्या माजी विद्यार्थ्याला आदरांजली वाहिली. देशासाठी दिलेल्या त्यांच्या या बलिदानासाठी एनडीएतर्फे लष्करी परंपरेनुसार एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी पुष्पचक्र अर्पण करून मेजर बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली.

एनडीएतील 'हट ऑफ रिमेम्बरन्स' या सन्माननीय ठिकाणी त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. 'हट ऑफ रिमेम्बरन्स' ही वास्तू देशासाठी शहीद झालेल्या एनडीएच्या माजी विद्यार्थ्यांच्या समरणार्थ उभारण्यात आली आहे. ही एनडीएतील महत्वपूर्ण वास्तू आहे. कर्नल बाबू हे एनडीएत जुलै 2010 ते डिसेंबर 2011 या दरम्यान प्रशिक्षक म्हणूनही नियुक्तीस होते. कर्नल बाबू यांचे बलिदान एनडीएतील्या विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा देत राहील, अशी अपेक्षा सुद्धा प्रबोधिनीतर्फे व्यक्त करण्यात आली.

 

हेही वाचा : भारत-चीन संघर्षात मार्ग काढण्याचा अमेरिकेचा प्रयत्न - ट्रम्प
 
वाॅशिंग्टन : भारत व चीनमधील ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दोन्ही देशांशी चर्चा करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.ओक्लाहामा येथे आपल्या निवडणूक रॅलीसाठी जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या सोमवारी लडाख येथे भारत व चीन यांच्या सैनिकांत धुमश्चक्री झाली. त्यात २० भारतीय जवान शहीद झाले. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या गुप्तचरांच्या अंदाजानुसार या हल्ल्यात किमान ३५ चीनी सैनिक ठार झाले आहेत. उभय देश आता संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. काय होते आहे यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आम्ही या परिस्थितीतून दोन्ही देशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करु, असे ट्रम्प यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने उभे ठाकले आहे. चीनच्या सीमेवरील देश कोरोनाशी लढण्यात गुंतले आहेत व चीन त्याचा फायदा घेऊन सीमेवरील तणाव वाढवतो आहे, असा आरोप अमेरिकेने केला आहे. चीनची पिपल्स रिपब्लिक आर्मी जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताबरोबर सीमेवरील तणाव वाढवत आहे. दक्षिण चीनच्या समुद्रातही चीनने लष्करी हालचाली सुरु केल्या असून तिथेही बेकायदेशीरपणे जास्तीच्या जागेवर हक्क सांगितला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपीओ यांनी केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख