कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरण्याची त्यांची इच्छा होती... - He wanted to come to Kolhapur and walk around Rankala... | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरण्याची त्यांची इच्छा होती...

संपत मोरे
गुरुवार, 23 जुलै 2020

कोल्हापूर  शहराचे त्यांचे जिव्हाळ्याचं नातं होते. हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर , श्रीरंग जाधव, महान भारत केसरी दादू चौगुले यांच्यासोबत त्यांच्या लढती झाल्या होत्या.

पुणे : " सादिक पंजाबी आणि कोल्हापूर यांचे एक अतूट नातं होतं हे नातं कधीही विस्मरणात जाणार नाही. सादिक यांची दादू चौगुले यांच्यासोबतची एक कुस्ती मी बघितली होती. सादिक पंजाबी यांच्यासारखा ताकदीचा पैलवान होणे नाही," अशा शब्दात 1978 चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी सादिक पंजाबी यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  आयुष्यात एकदा पुन्हा कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरण्याची त्यांची इच्छा होती. ती अपूर्ण राहिली.  

पाकिस्तानचे सुप्रसिद्ध पैलवान सादिक पंजाबी यांचे लाहोर येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातल्या कुस्तीक्षेत्रावर दुःखाचे सावट आले आहे. सादिक पंजाबी यांच्या आयुष्यातला बराच काळ कोल्हापूरात होते. कोल्हापूरमधील गंगावेश व मठ तालमीत सादिक यांची जडणघडण झाली. एक काळ त्यांनी गाजवला होता.त्यांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात होते.

कोल्हापूर  शहराचे त्यांचे जिव्हाळ्याचं नातं होते. कोल्हापूर शहरात असलेल्या खासबाग मैदानात सादिक पंजाबी यांच्या मास्टर चंदगीराम, हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर , श्रीरंग जाधव, महान भारत केसरी दादू चौगुले यांच्यासोबत त्यांच्या लढती झाल्या होत्या.

"मठ तालमीतून कुस्ती मेहनत करुन मलमली तीन बटनी कुर्ता व  सफेद लुंगी लावून लाल भडक कोल्हापुरी चप्पल करकर वाजवत ज्यावेळी सादिक कोल्हापूरच्या रस्त्यावरून चालायचा. त्यावेळी साऱ्यांच्या नजरा त्या देखण्या शरीराकडे पडायच्या. पांढऱ्याशुभ्र शिंपल्यात जसा मोती चमकावा तसा सादिक, धिप्पाड शरीर मात्र नजरेने कधी भुई सोडली नाही.

एखादा ओळखीचा माणूस समोर नमस्कार घालायचा त्यावेळी किंचित हसत हात छातीजवळ नेऊन नमस्कार स्वीकारत पुढे जायचा. जसा देहाने स्वच्छ होता तसाच चारित्र्याने. जशी नित्यनियमित कुस्ती मेहनत करत असे तसेच नित्यनियमित नमाज पठण करणे ही सादिक ची दिनचर्या होती. हिंदकेसरी मारुती माने आणि सादिक यांच्याइतका सौंदर्य संपन्न पैलवान होणे नाही. आज सादिक पंजाबी गेल्याची बातमी वाचली आणि मन सुन्न झाले."अशी प्रतिक्रिया हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी दिली आहे.

नामवंत पाकिस्तानी मल्ल सादिक पंजाबी (वय 84) यांचे नुकतेच निधन झाले. लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ही बातमी कोल्हापुरात धडकल्यावर कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त झाली. अनेकांनी कुस्तीतील हिरा हरपल्याची भावना व्यक्त केली. सादिक पंजाबी यांचे वडील निका पंजाबी हेही पैलवान होते. कुस्तीचे बाळकडू त्यांच्याकडूनच सादिक यांना मिळाले. कुस्ती लढतीच्या निमित्ताने निका पंजाबी वारंवार कोल्हापूरला येत होते. त्यामुळे त्यांना कोल्हापूरच्या कुस्तीची रग माहीत होती. मुलाने कुस्तीचे धडे कोल्हापुरातील तालमीत घ्यावेत, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी कोल्हापुरातल्या शाहू विजयी गंगावेश तालमीत दाखल केले होते. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख