‘एमपीएससी’ने घ्यावा ‘यूपीएससी’चा आदर्श..... - ‘MPSC’ should follow the ideal of ‘UPSC’  | Politics Marathi News - Sarkarnama

‘एमपीएससी’ने घ्यावा ‘यूपीएससी’चा आदर्श.....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 जून 2020

दोन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात ४२० जणांच्या यादीत सात ते आठ जागांवर २०१७ तुकडीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा त्याच रँकला निवड झाली आहे.

पुणे : दोन वर्षापूर्वी झालेल्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली होती, त्यांची यावेळी देखील पुन्हा त्याच पदावर निवड झाल्याने इतर विद्यार्थ्यांची संधी कमी होत असल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. विद्यार्थ्यांमधील निराशा व गोंधळ टाळण्यासाठी लोकसेवा आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रतिक्षा यादी जाहीर केली तर ज्यांना संधी मिळणार आहे. त्यांच्या मनातला गोंधळ आणि ताणतणावाची भावना राहणार नाही, अशी यामागची भूमिका असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या जाहीर झालेल्या निकालात ४२० जणांच्या यादीत सात ते आठ जागांवर २०१७ तुकडीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा त्याच रँकला निवड झाली आहे.२०१७ मधील आयोगाच्या निवड झालेल्या यादीत हे विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, आशा पदावर असताना यावेळी त्यांना पुन्हा तीच पदे मिळाली आहेत. आधी ज्या पदावर निवड झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा त्याच पदावर रूजू होणार नाहीत हे गृहीत धरून आयोगाने आधीच प्रतिक्षा यादी तयार करायला हवी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

स्पर्धा परीक्षामध्ये जूने निवड झालेले विद्यार्थी पुन्हा वरची रँक मिळवण्यासाठी परीक्षा देत असतात, पण बऱ्याच वेळा त्यांना वरची रँक न मिळता या आधी मिळालेली किंवा त्याखालची रँक मिळते. त्यामुळे निवड होऊन सुद्धा हे विद्यार्थी ती पोस्ट स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा न स्वीकारलेल्या जागा तशाच न भरता पडून राहतात. यामुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होते. यामुळे यावर्षी १० ते १५ नवीन विद्यार्थ्यांना याचा फटका बसला.

हे विद्यार्थी गुण असुनसुद्धा नोकरीपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थी पुढील वेळेस परीक्षा देताना वरच्या रँकसाठीच देत असतील तर यांचा आयोगाने विचार करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर प्रतीक्षा यादी लावली तर इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, अशी बहुसंख्य विद्यार्थ्यांची मागणी आहे.

लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांचे नेहमीच आक्षेप असतात. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत विद्यार्थ्यांचे फारसे आक्षेप नसतात. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाची कार्यपद्धती असायला काय हरकत आहे. नियमाप्रमाणे काम करून कार्यपद्धतीत विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टींत आयोगाने बदल केला तर आयोगाच्या कामकाजाबाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

 
हेही वाचा : सोशल मीडियापासून दूर.. नोकरी सांभाळून डीवायएसपीपदी  
 
केडगाव (पुणे) : "स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर टिव्ही व सोशल मीडियापासून दूर रहा. रोज दहा बारा तास अभ्यास केला तर सामान्य विद्यार्थी सुद्धा यश मिळवू शकतो. यश मिळपर्यंत पिच्छा सोडू नका," असे मत देऊळगावगाडा ( ता.दौंड ) येथील डीवायएसपीपदी निवड झालेली आरती राजेंद्र पवार हीने व्यक्त केले आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरती पवार ही मुलींमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. पवार हीने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले आहे. आयोगामार्फत तिची चौथ्यांदा निवड झाली आहे. यापुर्वी त्यांची पोलिस उपनिरीक्षक, मंत्रालय कक्ष अधिकारी व कर अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे. सध्या ती बारामती नगरपालिकेमध्ये कर अधिकारी म्हणून नोकरीला आहे. जिल्हा परिषदेचे आदर्श प्राथमिक शिक्षक राजेंद्र पवार यांची ती मुलगी आहे. तिचे प्राथमिक शिक्षण देऊळगावगाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांच्या या यशाबद्दल देऊळगावगाडा येथे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख