आरक्षणासाठी 10 ला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; गोलमेज परिषदेत ठोक मोर्चाचा इशारा - Maratha Morcha to observe Maharashtra Bandh in October | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणासाठी 10 ला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; गोलमेज परिषदेत ठोक मोर्चाचा इशारा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता आरक्षण पूर्ववत होण्यासाठी शासनाने कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करत याच मागणीसाठी १० ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा मराठा गोलमेज परिषदेत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.

कोल्हापूर : मराठा समाजाच्या संयमाचा अंत न पाहता आरक्षण पूर्ववत होण्यासाठी शासनाने कायदेशीर पावले उचलावीत, असे आवाहन करत याच मागणीसाठी १० ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद करण्याची घोषणा मराठा गोलमेज परिषदेत मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली. राज्य शासनाने मराठा समाजासाठी काल ज्या सवलतीच्या योजना जाहीर केल्या त्यासाठी पैसे कोठून आणणार, अशी विचारणाही त्यांनी केली.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभर असंतोष खदखदत असताना कोल्हापुरातून राज्यव्यापी आंदोलनाची दिशा निश्‍चित व्हावी, यासाठी गोलमेज परिषद झाली. यापुढे संघटना वेगवेगळे आंदोलन न करता 'एक मराठा लाख मराठा' या शीर्षकाखाली आंदोलन सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. या परिषदेला राज्यभरातून विविघ मराठा संघटनांचे पन्नास प्रतिनिधी उपस्थित होते. प्रसंगी मूक मोर्चे नव्हे, तर ठोक मोर्चे काढू, असा इशाराही देण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

समिती समन्वयक विजयसिंह महाडिक, भरत पाटील, प्रा. नामदेव जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक पाटील, संतोष पाटील, राजकुमार सूर्यवंशी, दादाराव पाथरीकर, विशाल पाटील, भास्कर जाधव, अनिल वाघ, सुधाकर माने, शिवसेनेचे उत्तरचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, नगरसेवक अजित राऊत, सुनीता पाटील, प्रसाद जाधव, वंदना मोरे, दिग्विजय मोहिते, रवी पाटील, इंद्रजित बोंद्रे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश पाटील म्हणाले, "गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या संघर्षातून आरक्षण मिळाले; पण तेही टिकले नाही. आमचा लढा कोणत्या पक्षाविरोधात नसून आरक्षणाच्या मागणीसाठी आहे. स्थगिती मिळाली म्हणून लढा संपणार नसून तो भविष्यात अधिक आक्रमक होईल. आम्ही काही राजकीय आरक्षण मागितले नव्हते. मुलांच्या शिक्षणाचा, तसेच नोकरीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे उद्रेक निर्माण झाला. आम्हाला मुद्दमाहून कोणाला अडचणीत आणायचे नाही. खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार उदयनराजे यांचे नेहमीच आंदोलनाला सहकार्य मिळाले. आरक्षणासंबंधी नेमकी कोणती कायदेशीर पावले उचलणार, हे शासनाने स्पष्ट करावे. सर्वांच्या संमतीने कायमस्वरूपी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक देत आहोत.''

इतिहास अभ्यासक प्रा. नामदेव जाधव म्हणाले, "युद्धात जिंकलो आणि तहात हरलो, अशी आपली अवस्था झाली आहे. ज्यांचे पोट भरले आहे, त्यांनी आता मराठ्यांचा विचार करावा. आरक्षण पूर्ववत व्हायचे असेल, तर संसद आणि न्यायालय या दोन चौकटीतून जाणाराच मार्ग शिल्लक आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून न्याय द्यावाच लागेल.'' 

नगरसेवक अजित राऊत म्हणाले, "कोणताही स्वार्थ ठेवून कोणीही काम करू नये. आरक्षणासाठी प्रसंगी पदाचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल.'' सुजित चव्हाण यांनी शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळ हे क्रांती मोर्चाच्या काळात वॉर रूम होते. पुढील लढाईत मंडळाचे दरवाजे समाजासाठी कायम खुले राहतील, असे सांगितले. रविकिरण इंगवले म्हणाले, "पेटवापेटवीचा उद्योग न करता अन्य समाजबांधवांनी मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहावे. जातीय तेढ निर्माण न करता सांघिक लढा द्यावा.''

महेश जाधव म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी सर्वांना बैठकीला बोलवावे. प्रसंगी दिल्लीत आंदोलन उभे करावे लागेल; पण आता निर्णायक लढूया. आमदार, खासदारांचे राजीनामे घेऊन प्रश्‍न सुटणार नाही. त्यांना आंदोलनात सहभागी करून घेऊया.'' मराठा आंदोलनात ज्या ५२ जणांनी बलिदान दिले त्यांच्या वारसांच्या नोकरीचे काय झाले, असा सवाल विजयसिंह खाडे यांनी केला.

परिषदेतील मंजूर ठराव
राज्य शासनाने न्यायालयातून आरक्षणाची स्थगिती उठवावी
या आर्थिक वर्षातील शैक्षणिक शुल्काचा परतावा मिळावा
केंद्र सरकारच्या आर्थिक दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ मिळावा
सर्व प्रकारच्या नोकरभरतीला स्थगिती द्यावी
"सारथी' तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी
मराठा वसतिगृहांची उभारणी करावी
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे
बलिदान दिलेल्यांना आर्थिक मदत व नोकरीत सामावून घ्यावे
शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात
शिवस्मारकाचे काम तातडीने चालू करावे
शेतकऱ्यांची बिले माफ करावीत
कोपर्डी प्रकरणातील दोषींना शिक्षा द्या
गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तीनशे कोटींची तरतूद करा

खासदारांच्या राजीनाम्याची मागणी
आरक्षणाच्या स्थगितीची जबाबदारी घेऊन खासदारांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी प्रा. नामदेव जाधव यांनी केली. विजयसिंह महाडिक यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कडक पोलिस बंदोबस्त
परिषदेला पोलिस बंदोबस्त तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेण्यात आली. भगव्या रंगाच्या टोप्या, स्कार्प यामुळे सभागृह भगवेमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मध्यभागी ठेवून पूजन करण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख