आदित्य ठाकरे यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत काय? - do you know these things about adity thackrey | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत काय?

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 13 जून 2020

आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.

पुणे : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय? आदित्य यांनी आज आपल्या वयाची तीस वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्याकडे पर्यटन आणि राजशिष्टाचारा अशी दोन्ही खाती आहेत.

-वडिल मुख्यमंत्री आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मुलगा कॅबिनेटमंत्री असे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आदित्य यांच्यामुळे घडत आहे. वडिल उद्धव हे मुख्यमंत्री आणि आदित्य हे पर्यावरणमंत्री अशी दोन्ही पदे एकाच घरात आहेत.

 

-शिवसेनेचा नेता हे पद संघटनेत महत्त्वाचे मानले जाते. आदित्य यांना वयाच्या 28 व्या वर्षी या पदावर नेमण्यात आले. 

-उद्धव व रश्मी ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या आदित्य यांचे शिक्षण माहीम येथील बाॅम्बे स्काॅटिश स्कूलमधून झाले. त्यांनी सेंड झेवियर काॅळेजमधून बीएची पदवी घेतली आणि के. सी. लाॅ काॅलेजमधून त्यांनी एएएलबी पूर्ण केले.

-आदित्य हे कवी आणि गीतकारही आहेत. त्यांनी इंग्रजीत कविता केल्या आहेत. त्यांचा   'My Thoughts in White and Black' हा कवितासंग्रह 2007 मध्ये प्रकाशि झाला होता. त्यांच्या गाण्यांचा उम्मीद म्हणून अल्बम त्याच वर्षी काढण्यात आला होता. सुरेश वाडकर, शंकर महादेवन, सुनिधी चौहान आदींनी त्यातील गाणी म्हटली होती. शिवसेनाप्रमुख व आदित्य यांचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन झाले होते. वडिलांप्रमाणे त्यांनाही छायाचित्रणाची हौस आहे. पण उद्धव यांना वाइल्ड फोटोग्राफीची जास्त आवड आहे. आदित्य यांना त्याउलट abstract, light and shadow मधील फोटोग्राफीत मजा येते. 

 

-आदित्य यांचे पहिले आंदोलन म्हणजे शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाविरोधात होते. रोहिंटन मिस्त्री यांनी `सच अ लाॅंग जर्नी`या शिवसेनेची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचा समावेश मुंबई विद्यापीठाने त्यांच्या यादीत केला होता. त्याविरोधात हे आंदोलन झाले.

-निवडणूक लढणारे आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. मंत्री होणारे दुसरे. कारण त्यांच्या आधी त्यांचे वडिल हे मुख्यमंत्री झाले होते.

-त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लढवली. युवा सेनाप्रमुख म्हणून त्यांची 2010 मध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2017 मध्ये मुंबई जिल्हा फुटबाॅल संघटनेचे ते अध्यक्ष झाले. 2020 मध्ये ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनले.

-निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार तीस वर्षीय आदित्य हे 16.50 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालकी आहेत. त्यातील साडेचार कोटी रुपयांच्या चार स्थावर मालमत्ता त्यांचे वडील उद्धव यांनी एकाच दिवशी म्हणजे 8 एप्रिल 2013 रोजी भेट दिलेल्या होत्या.

- अभिनेत्री दिशा पटनी हिच्यासोबत लंचला गेल्याचा आदित्य यांचा फोटो सोशल मिडियात बराच गाजला होता. लोकसभा निवडणूक काळात त्यांचे बरेच फोटो विरोधकांनी चर्चेत आणले होते. 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख