निलेश राणे एकेरीवर आले...रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला! - ex MP nilesh rane criticizes raohit pawar on Sugar package | Politics Marathi News - Sarkarnama

निलेश राणे एकेरीवर आले...रोहित पवारांना सर्वत्र नाक न खुपसण्याचा सल्ला!

गणेश कोरे
शनिवार, 16 मे 2020

साखरेच्या प्रश्नावरून सुरू झालेली चर्चा वैयक्तिक पातळीवर गेली...

पुणे : माजी खासदार निलेश राणे हे त्यांच्या वावदूकपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते राज्यातील अनेक नेत्यांचा विशेषतः शिवसेनेतील नेत्यांचा एकेरीत उल्लेख करत असतात. त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलतात. आता त्यांनी हाच कित्ता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल गिरवला आहे. या दोन तरुण नेत्यांत ट्विटर युद्ध सुरु झाले असून, उत्तराला प्रत्युत्तर देताना, एकेरी उल्लेख करत, हमरीतुमरीवर आले आहेत. रोहित यांनी `कुक्कुटपालन` हा शब्द आपल्या ट्विटमध्ये वापरला होता. त्यावरून हा वाद पेटला. प्रश्न साखरेचा आणि चर्चा कुक्कुटपालनवर गेल्याने मग सोशल मिडियातही त्यावर चर्चा सुरू झाली. आपापल्या नेत्यांचे समर्थक मग या ट्विटर युद्धात उतरले. दोन्ही बाजूंनी शेलक्या शब्दांत प्रश्न आणि उत्तरे दिसून येत आहेत. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साखर उद्योगासाठीच्या पॅकेजच्या मागणी संदर्भात केलेल्या पत्राचा संदर्भ घेत निलेश राणे यांनी ट्विट करत, `साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर आॅडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा? असे आवाहन केले होते. या ट्विटलाला पवार यांचे नातू, साखऱ कारखानदार आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले.

यावेळी रोहित पवार म्हणाले की `मी आपणास सांगू इच्छितो की पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.त्यामुळे काळजी नसावी.`

वरिल ट्विटला उत्तर देताना निलेश राणे यांनी एकेरी उल्लेख करीत, रोहित यांना प्रत्त्युतर दिले आहे. ते म्हणतात,‘‘ मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुक्कुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदारसंघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी.`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख