पगार व कामगार कपातीच्या आदेशाला केराची टोपली ; 68 तक्रारी  - 68 complaints of pay cuts in the labor department | Politics Marathi News - Sarkarnama

पगार व कामगार कपातीच्या आदेशाला केराची टोपली ; 68 तक्रारी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 मे 2020

कामावरून काढून टाकण्यात आले किंवा पगार कपात केल्याच्या 68 तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत.

पुणे : लॉकडाउनमुळे कंपनीचे उत्पादन घटले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे कारण पुढे करत कामावरून काढून टाकण्यात आले किंवा पगार कपात केल्याच्या 68 तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत.

कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते.या सर्व तक्रारी आयटी कंपन्या, उत्पादन क्षेत्र,  विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यामधील नोकरदारांनी केल्या आहेत.

उद्योग-व्यवसाय बंद असल्याने मालकांनी एक तर पगार कपात केली किंवा कोणतीही सूचना न देता अचानक कामावरून काढून टाकले, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित कंपनी किंवा सेवा पुरवठादार यांच्याशी संपर्क करून कामगारांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

ज्या कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे, त्यांना पुन्हा करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तर पगार कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडे पुरेसा निधी उपलब्ध होताच पगार देऊ, असे संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनाने कळविले आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी दिली.

केंद्र सरकारने निर्देश देत, औद्योगिक क्षेत्र, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनातील कर्मचाऱ्यांना कोणतीही कपात न करता पगार देण्याचे व कामावरून न काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानंतरही विविध कंपन्यांकडून कर्मचारी कपात, वेतन कपात, वेतन रोखून धरणे, सक्तीच्या रजेवर पाठविणे, अर्धे वेतन देणे, असे निर्णय घेतले जात आहेत. अचानक आलेल्या या संकटातून मार्ग निघावा, यासाठी नोकरदार कामगार विभागाकडे भाव घेत आहे.

या ठिकाणी करता येणार तक्रार 

बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरीता पनवेलकर यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कार्यालयाचा संपर्क क्रमांक 020-25541617, 020-25541619  हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( दूरध्वनी क्रमांक 020 - 27373022)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी केवळ पगार किंवा कर्मचारी कपातीच्या तक्रारी करता येतील.

सामाजिक संस्था, कर्मचारी संघटना, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नियुक्त करण्यात अधिकारी यांच्या माध्यमातून कामगारांच्या विविध तक्रारी विभागाकडे दाखल होत आहेत. त्याची गंभीर दखल घेत त्या सोडविण्यासाठी करीत प्रयत्न केले जात आहेत. पगार कपात केल्याच्या जवळपास सर्वच तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. तर कामावरून काढण्यात आलेल्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.
विकास पनवेलकर, उपायुक्त, कामगार विभाग

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख