नरेंद्र मोदींनी कौतुक केलेल्या राजेंद्र जाधवांनी केलेय तरी काय? - Narendra Modi Applauded Nashik Farmer Rajendra Jadhav's work in Maan Ki Baat | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदींनी कौतुक केलेल्या राजेंद्र जाधवांनी केलेय तरी काय?

सरकारनामा ब्युरो
रविवार, 31 मे 2020

बागलाणचे शेतकरी राजेंद्र जाधव वृत्तीने संशोधक आहेत. त्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी अनोखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या प्रयोगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात’ कार्यक्रमात कौतुक केले.

नाशिक : येथील बागलाणचे शेतकरी राजेंद्र जाधव वृत्तीने संशोधक आहेत. त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सॅनिटायझर फवारणी यंत्र विकसित केले आहे. या प्रयोगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  ‘मन की बात’ कार्यक्रमात कौतुक केले. त्यामुळे ते प्रकाशझोतात आले आहेत. 

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी 'मेक इन इंडिया' अंतर्गत संशोधित सॅनिटायझर मशीनमुळे कोरोना उच्चाटनाच्या युद्धात मोठे बळ मिळाले आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते संशोधक राजेंद्र जाधव यांच्या या शोधामुळे नाशिकची मान उंचावली आहे. रस्ते, वसाहती, लिफ्ट, घरांचे दरवाजे, कंपाऊंड गेट, भिंती आदींना माणसांचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही मार्गाने स्पर्श होणाऱ्या विविध जागांवर निर्जंतुकीकरण करून संसर्ग टाळणे शक्य आहे. हे आव्हानात्मक काम मनुष्यबळाची कमतरता असल्याने इच्छा असूनही होताना दिसून येत नाही.

सटाणा नगरपरिषदेला दिले यंत्र

संसर्गित जागांची तातडीने फवारणी करणे अत्यावश्यक ठरते. वऱ्हाणे ता. बागलाण येथील श्री. जाधव यांनी त्यांच्या शेतातील पिकांवर फवारणीसाठी यंत्र निर्मित केले. त्या यंत्राची उपयुक्तता तपासून कोरोना संकट काळात त्यांनी हे यंत्र सटाणा नगरपरिषदेला वापरासाठी दिले. आरोग्य खात्याच्या मानकाप्रमाणे ह्या यंत्रामुळे कोरोना निर्जंतुकीकरणाच्या लढाईला मोठे बळ मिळाले. कोरोना संसर्गाच्या कठीण परिस्थितीत सॅनिटायझेशनसाठी ह्या यंत्रामुळे आत्मनिर्भरतेची शिकवण मिळाली.

'यशवंत' उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

त्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ठरलेल्या यंत्राची दखल देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी 'मन की बात' मधून देशवासीयांशी संवाद साधला. ह्या संवादावेळी त्यांनी  श्री. जाधव यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यामुळे यंत्रभूमी नाशिकच्या शेतकऱ्यांची कुशलता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. श्री. जाधव यांच्या प्रयोगामुळे कोरोना संकटात निर्जंतुकीकरण मोहिमेला मोठा वेग आला आहे. भविष्यकाळात या यंत्रामुळे प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला खूप मोठा आधार मिळणार आहे. त्यांनी बनवलेल्या या यंत्रांचे नाव त्यांनी ‘यशवंत’ ठेवले असून त्यांच्या या यशवंत उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवघ्या 25 दिवसांमध्ये श्री.जाधव यांनी ट्रॅक्टरवर बसवता येवू शकेल, असे नाविन्यपूर्ण फवारणी यंत्रणा विकसित केले. त्याने रस्ते, दारे, कुंपणाच्या भिंती अगदी स्वच्छ धुवून काढणे शक्य होत आहे. या स्वच्छता यंत्रामध्ये एकावेळेस ६०० लीटर जंतुनाशक मिश्रीत द्रावण टँकरमध्ये ठेवण्याची सुविधा आहे.

या यंत्रामध्ये  मानवी हस्तक्षेपाची फार कमी आवश्यकता भासते. त्यामुळे विषाणूंचा मानवाशी संपर्क येण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त ट्रॅक्टर चालक यंत्र संचलित करून संपूर्ण गावाची स्वच्छता करू शकते. याची पंतप्रधानांनी दखल घेतल्याने आनंद झाला. -  राजेंद्र जाधव, यंत्र विकासक.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख