विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : अंतिम वर्षाची परीक्षा होणारच - central government allows universities to hold final year examination | Politics Marathi News - Sarkarnama

विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : अंतिम वर्षाची परीक्षा होणारच

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जुलै 2020

लॉकडाउनमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. 

नवी दिल्ली : विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने आज परवानगी दिली. याबाबत केंद्र सरकारने उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठविले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. 

गृह मंत्रालयाने परीक्षा घेण्याबाबतच्या नियमावलीला मान्यता दिली आहे. या नियमावलीनुसार  आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना सत्र व अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास सांगितल्याची चर्चा होती. कोरोना संकटामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यापीठे, महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वातावरण होते. अखेर गृह मंत्रालयाच्या निर्णयामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. 

याआधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटले होते की, विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतच्या नियमावलीचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. यात विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यासोबत प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा लक्षात घेण्यास सांगितले होते. 

याआधी हरियानातील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलुगुरू आर.सी.कुहड यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घ्याव्यात, अशी शिफारस केली होती. तसेच, सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अंगर्तत मूल्यांकन अथवा परीक्षा यापैकी शक्य तो पर्याय निवडावा, असेही म्हटले होते. याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक वर्ष द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्टपासून सुरू करावे, असे म्हटले होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होईल, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने नमूद केले आहे. 

दरम्यान, याआधी महाराष्ट्र सरकारने अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थांना परीक्षेचा ऐच्छिक पर्याय दिला होता. पदवी प्रमाणपत्र हवे असणाऱ्या विद्यार्थांना विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून निकाल घोषित करावा. तर ज्या विद्यार्थांना परीक्षा द्यायची आहे, त्यांच्या परीक्षेचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. यामुळे पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रखडल्या होत्या. या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सत्राच्या गुणांची सरासरी काढून गुणदान केले जाईल असे जाहीर केले होते. या निर्णयाला राज्यपालांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने विधी विभागाचे मत घेतले होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख