ब्रेकिंग : सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात - cbse rationalises syllabus by up to 30 percent for classes nine to twelve | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग : सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जुलै 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्यास विलंब होणार आहे. यामुळे याचा परिणाम अभ्यासक्रम शिकवण्यावर होणार असल्याने त्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्यास येत्या शैक्षणिक वर्षात विलंब होणार आहे. याचा परिणाम अभ्यासक्रम शिकवण्यावर होणार आहे. यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी 30 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मंगळवारी ही माहिती दिली. 

निशंक म्हणाले की, देशात आणि जगभरात कोरोनामुळे अतिशय आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी ते बारावीसाठी अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात येणार आहे. याबाबत देशातील शिक्षणतज्ज्ञांकडून काही आठवड्यांपूर्वी मते मागविण्यात आली होती. त्यांच्याकडून सुमारे दीड हजारहून अधिक शिफारशी आलेल्या आहेत. त्यांच्या प्रतिसादाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

याआधी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने परवानगी दिली होती. याबाबत केंद्र सरकारने उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठविले असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा बंधनकारक असल्याचे म्हटले होते.  गृह मंत्रालयाने परीक्षा घेण्याबाबतच्या नियमावलीला मान्यता दिली आहे. या नियमावलीनुसार  आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठे आणि महाविद्यालयांना सत्र व अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यास सांगितल्याची चर्चा होती. कोरोना संकटामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यापीठे, महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम वातावरण होते. अखेर गृह मंत्रालयाच्या निर्णयामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. 

याआधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी म्हटले होते की, विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबतच्या नियमावलीचा पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. यात विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यासोबत प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचीही सुरक्षा लक्षात घेण्यास सांगितले होते. 

याआधी हरियानातील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलुगुरू आर.सी.कुहड यांच्या अध्यक्षतेखालील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलैमध्ये घ्याव्यात, अशी शिफारस केली होती. तसेच, सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अंगर्तत मूल्यांकन अथवा परीक्षा यापैकी शक्य तो पर्याय निवडावा, असेही म्हटले होते. याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन शैक्षणिक वर्ष द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी 1 ऑगस्टपासून सुरू करावे, असे म्हटले होते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होईल, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने नमूद केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख