सत्तेसाठी शिवसेना सोनिया सेना झाली..कंगनाचा उद्धव ठाकरेंना टोला -  Kangana Ranaut has criticized Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तेसाठी शिवसेना सोनिया सेना झाली..कंगनाचा उद्धव ठाकरेंना टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

कंगना राणावत म्हणते की तुम्ही माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नका किती जणांचे तोंड बंद करणार ? किती दिवस तुम्ही सत्यापासून दूर पळणार ?

मुंबई : "ज्या विचारधारेतून शिवसेना निर्माण झाली, ती विचारधारा विकून आज सत्तेसाठी शिवसेना सोनिया सेना झाली आहे, ज्या गुंडांनी माझ्या मागे माझे घर तोडले, त्यांना स्थानिक प्रशासन म्हणून नका, भारतीय संविधानाचा इतका मोठा अपमान करू नका," असं टि्वट करून पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना राणावतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. 

कंगना राणावत व राज्य सरकार, विशेषतः शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मुंबईवर कंगनाने केलेल्या वक्तव्यावर तिचा निषेध होत असताना मुंबई महापालिकेने पाली हिल भागातील तिच्या बेकायदेशीर बांधकामावर काल धडक कारवाई केली. कंगनाने यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून टि्वट केले होतं. 

कंगना राणावत आपल्या टि्वटमध्ये म्हणते की तुम्ही माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नका किती जणांचे तोंड बंद करणार ? किती जणांचे आवाज बंद करणार ? किती दिवस तुम्ही सत्यापासून दूर पळणार ? तुम्ही कोणीही नाही. तुम्ही फक्त एक घराणेशाहीतील व्यक्ती आहात.   

विधिमंडळ अधिवेशानामध्ये उद्धव ठाकरे यांना कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे म्हणाले होते की अन्य प्रांतातून अनेक जण महाराष्ट्र, मुंबईत येतात. नाव कमावतात, रोजी-रोजी कमावतात. यातील काही जण हे या राज्याविषयी ऋण व्यक्त करतात, काही जण ऋण मानत नाही. 

कंगनाविरोधात महाराष्ट्रात वातावरण तापले असल्याने केंद्रातील मोदी सरकारने तिला 'वाय' सुरक्षा दिली आहे. तिने 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचे जाहीर केले होते. यावर शिवसेनेने कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशा इशारा दिला होता. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला होम क्वारंटाईन करण्याचा इशारा दिला होता. यामुळे कंगनाने मुंबईला जाण्यासाठी जोरदार तयारी केली. तिने कोरोना चाचणी केली. मुंबईत गेल्यानंतर होम क्वारंटाईन व्हावे लागू नये म्हणून तिने ही शक्कल लढविली होती. 

कंगनासोबत तिची बहीण रंगोली चंडेल आणि आणखी एका व्यक्तीची चाचणी करण्यात आली होती. कंगना कालसकाळी वाय सुरक्षेसह चंडीगडमधील चंडीगड विमानतळावर आली. तेथून विमानाने ती मुंबईकडे रवाना झाली होती. ती मुंबई विमानतळावर दाखल झाली. कंगनाचे विमानतळावर दाखल झाल्यानंतर सीआरपीएफच्या पथकाने तिला त्यांच्या वाहनात बसवले. तेथून तिला घेऊन तातडीने पथक बाहेर पडले. 

कंगनाला विरोध करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने विमानतळावर जमले होते. याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्तेही विमानतळावर जमले आहेत. शिवसैनिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विमानतळावर जोरदार घोषणाबाजी सुरू होती.विमानतळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) बंदोबस्त तैनात करण्यात आला होती. यात करनी सेनाही कंगनाच्या बाजूने मैदानात उतरली होती. 
 Edited  by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख