घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार? नितेश राणेंचा हल्ला (व्हिडिओ) - Nitesh Rane Attacks CM Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार? नितेश राणेंचा हल्ला (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

मंदीरे सुरु करण्याबाबत भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. सिंधुदुर्गातही आज नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात टीका केली

सिंधुदुर्ग : "आताचे सरकार इशारा देण्याच्या लायकीचे आहे काय? आम्ही घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार? बार सुरु आहेत, पण मंदीरे ग्रंथालये बंद आहेत. मुख्यमंत्र्यांकडे थोडीतरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी मंदीरे सुरु करावीत,''असा घणाघात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.

मंदीरे सुरु करण्याबाबत भाजपच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. सिंधुदुर्गातही आज राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून भाजप काय इशारा देणार? असे विचारले असता नितेश राणे म्हणाले, ''हे इशारा देण्याच्या लायकीचे आहेत का? घरातून बाहेर येणाऱ्यांना इशारे द्यायचे असतात. घरकोंबड्या मुख्यमंत्र्यांना काय इशारा देणार? ते चौकटीतून बाहेरच येत नाहीत. म्हणून आम्ही आंदोलन करतो आहोत. यातून त्यांना काही अक्कल येईल, अशी अपेक्षा आहे,"

राणे पुढे म्हणाले, "स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे, ज्यांना हिंदुहृदयसम्राट अशी उपाधी आहे, त्यांचा मुलगा सन्माननीय उद्धव ठाकरे ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अशावेळी राज्यातली मंदीरे उघडी करा म्हणून नागरिकांना आंदोलने करावी लागतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. या सरकारचे डोके खरेच ठिकाणावर आहे का हा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. गेले आठ-नऊ महिने राज्य करत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याची पूर्ण लाज उतरवून टाकली आहे. बाळासाहेबांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांचा नातूही मंत्री आहे. अशावेळी आंदोलने करावी लागतात यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी असू शकत नाही,''

''सिंधुदुर्ग मध्ये मटका, जुगार खुलेपणाने सुरु आहे. काही शिवसेनेची मंडळीही त्यात सहभागी आहेत. रात्रभर जुगार खेळतात. त्यांना कसली भीती नाही. पोलिस त्यांना अडवायला जात नाहीत. इकडे मंदीरे उघडी करण्यासाठी आम्हाला आंदोलने करावी लागतात. आम्ही जर आज मंदीरात जाऊन आरती केली तर आमच्यावर गुन्हे दाखल केले जातील. आम्हाला कायदे कलम दाखवले जातील. पण मटका जुगार पार्ट्या बंद होणार का? राज्यातले मंत्री पार्ट्या करताहेत, त्याच्यामुळे हत्या होताहेत, बलात्कार होत आहेत. त्यांना का थांबवत नाहीत,'' असेही राणे म्हणाले.

''पार्ट्या, जुगार थांबवत नाहीत. पण मंदीरे ग्रंथालयांमुळे देशाला आकार मिळू शकतो ती ठिकाणे बंद ठेवतात. हे नशा करणाऱ्या, बेवड्या लोकांचे सरकार आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आमच्या जिल्ह्यातली संस्कृती भजनाची आहे. दशावतारी कलाकार आहेत. त्यांनी काय बिअर बारकडे बघत दिवस काढायचे? बारचे मालक, वेटर सगळे कमावताहेत. कलाकार, पुजारी यांना आंदोलने करावी लागतात हे बाळासाहेबांना कधीही पटले नसते,'' असेही राणे म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख