MLA Bhaskar Jadhav Finding Safe Constituency for Son Vikrant Jadhav | Sarkarnama

पूत्र विक्रांत यांच्यासाठी भास्कर जाधवांची पेरणी?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव सलग तीन वेळा निवडून आले. मात्र, त्यांना चिपळूणमधून सलग तीन वेळा निवडून येण्याचा पराक्रम करता आला नाही. गुहागरमध्ये त्यांना राजकीय स्पर्धक आता उरलेला नाही. जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना शिवसेनेकडून कडवे आव्हान होते. मात्र, ते स्वतःच आता शिवसेनेत आल्याने त्यांच्यासाठी गुहागर सुरक्षित मतदारसंघ झाला आहे. 

चिपळूण : शिवसेनेची ताकद तालुक्‍यात वाढविण्यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सक्रीय होण्याचा निर्णय घेतला आहे. आपण चिपळूणमध्ये सक्रिय झाल्यास ते गुहागरची जबाबदारी पुत्र विक्रांतकडे देणार की विक्रांतच्या राजकीय वाटचालीसाठी चिपळूणमध्येच पेरणी करायला सुरुवात करणार, याबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव सलग तीन वेळा निवडून आले. मात्र, त्यांना चिपळूणमधून सलग तीन वेळा निवडून येण्याचा पराक्रम करता आला नाही. गुहागरमध्ये त्यांना राजकीय स्पर्धक आता उरलेला नाही. जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना शिवसेनेकडून कडवे आव्हान होते. मात्र, ते स्वतःच आता शिवसेनेत आल्याने त्यांच्यासाठी गुहागर सुरक्षित मतदारसंघ झाला आहे. 

रामदास कदम विधान परिषदेवर गेले. त्यानंतर त्यांनी पुत्र योगेश यांच्यासाठी दापोली विधानसभा मतदारसंघात सुरक्षीत करायला सुरुवात केली. योगेश कदम हे संजय कदम यांच्याविरोधात निवडून आले. आता भास्कर जाधव यांचाही पूत्र विक्रांत यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू आहे. मी आणि माझा मुलगा हे दोघे एक दिवस एकत्र विधानसभेत असू, असे आमदार जाधव यांनी यापूर्वी सांगितले आहे. विक्रांत जाधव सध्या रत्नागिरी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. 

चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण पराभूत झाले आहेत. तेथे शेखर निकम यांचे प्रस्थ वाढते आहे. त्यांना आव्हान द्यायचे असेल, तर चिपळूणमध्ये शिवसेनेला तगड्या उमेदवाराचा शोध घेणे भाग आहे. यासाठीच सेना कार्यकर्त्यांनी आमदार जाधव यांना सक्रिय होण्याची विनंती केली आहे. पक्षाच्या चौकटीत राहून मी चिपळूणमध्ये काम करेन आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.

विक्रांतमध्ये माझे गुण आहेत. तो माझ्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय वाटचाल करतो आहे. पक्षाने त्याला संधी दिली तर तोही एक दिवस आमदार होईल. चिपळूणमध्ये आगामी काळात शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, हे पक्ष ठरवेल, असे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख