पुणे 'पदवीधर' मध्ये शिवसेनेचीही उडी; अक्षय आढळराव यांचे नांव यादीत - Shivsena Names Akshay Adhalrao for Pune Graduate Constituency | Politics Marathi News - Sarkarnama

पुणे 'पदवीधर' मध्ये शिवसेनेचीही उडी; अक्षय आढळराव यांचे नांव यादीत

भरत पचंगे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

पुणे पदवीधर मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी तीनच दिवस बाकी असताना यात आता शिवसेनेने उडी घेतली असून निवडून येण्याची क्षमता असणा-या तब्बल पाच उमेदवारांची यादी थेट मातोश्रीवर पाठविण्यात आली आहे.

शिक्रापूर : निवडून येण्याची क्षमता असणा-या तब्बल पाच उमेदवारांची यादी थेट मातोश्रीवर पाठविण्यात आली आहे. अर्थात या शिवसेनेच्या चालीने पुणे मतदार संघातील राष्ट्रवादीच्या डोक्याला ताप होणार हे नक्की. दरम्यान या यादीत सर्वात मोठे नाव शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांचे चिरंजीव अक्षय आढळराव व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचे असल्याने महाआघाडीसाठी हा मोठा पेच असणार आहे.

पुणे पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीकडून उमेदवार उतरविण्याची महाविकास आघाडीची तयारी होवून तशी उमेदवार चाचपणी व निश्चिती सुरू आहे. अर्थात पद्वीधर मतदार संघाकडे दूर्लक्ष करुन कॉंग्रेसने पुणे शिक्षक मतदार संघातून उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू करुन उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू केल्या आहेत. अर्थात दोन्ही मतदार संघ कॉंग्रेस-राष्ट्रवादी वाटून घेण्याचे राजकारण शिवसेनेच्या एव्हाना लक्षात येताच आणि विधानसभेनंतर शिवसैनिकांना ठोस काहीच दिले गेले नसल्याने पुणे पद्वीधर मतदार संघात आपलाही उमेदवार असावा आणि महाआघाडी सरकारमधील सर्व पक्षांनी त्याला पाठींबा द्यावा म्हणून पुणे शिवसेनेने रविवारी (ता.०८) पुण्यात बैठक घेवून आपली यादी कालच्या काल तात्काळ मातोश्रीवर पाठविली व आपला दावा निश्चित केला आहे.

पाच जणांच्या संभाव्य उमेदवार यादीत सर्वात मोठे नाव म्हणून शिवसेनेकडून शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांचे चिरंजीव अक्षय आढळराव-पाटील हे असून त्याखालोखाल यावेळी विधानसभेला माघार घेतलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा आंबेगाव तालुका शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे तसेच पुणे शहरातील प्रितम उपलप, आनंद दवे, समिर दोरगे आदींचा या यादीत समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रमुख माऊली कटके यांनी दिली.  

जिल्हाप्रमुख माऊली कटके आक्रमक
राज्यात महाआघाडी झाल्याने पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा प्रमुख शत्रु असलेल्या राष्ट्रवादीशी सोबत राहताना सर्वच शिवसेनेची मोठी कुचंबणा होतेय हे लपून राहिलेले नाही. शिरुरमधील एका कार्यक्रमात मागील आठवड्यात जिल्हाप्रमुख कटके यांनी 'आम्हाला फार गृहीत धरु नका..' असे जाहीर वक्तव्य थेट राष्ट्रवादीला उद्देशून केले होते. पर्यायाने थेट राष्ट्रवादीशी पंगा घेत पाच संभाव्य उमेदवारांच्या यादीमुळे राष्ट्रवादीला जेरीस आणण्याची संधी म्हणून पुणे जिल्हा शिवसेना विधानसभेची उमेदवारी खेचून आणतेय का, त्याचीच उत्सुकता या निमित्ताने असणार आहे.  
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख