नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. पटोले यांच्या जागेवर दावा सांगण्यासाठी भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत पोचले आहेत. विधानसभा अध्यक्षपद किंवा मंत्रिपद मिळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे थोपटे यांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आज (ता. 4 फेब्रुवारी) उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सादर केला. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांच्यासह भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, दिल्लीतील विविध घडामोडी आणि पटोले यांचा राजीनामा पाहता प्रदेशाध्यक्षपदी पटोले यांचे नाव निश्चित समजले जाते. मात्र, कॉंग्रेसचा इतिहास पाहता नाव जाहीर होईपर्यंत कोणतीही गोष्ट ग्राह्य धरता येत नाही.
प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड जरी जाहीर झाले, तरी त्यांचे रिक्त होणारे पद मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्षात तीव्र स्पर्धा बघायला मिळत आहे. या पदासाठी थोपटे यांच्यासह परभणीचे आमदार सुरेश वडपूरकर, मुंबईचे आमदार अमिन पटेल यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर पुण्यातून कॉंग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांचे नाव चर्चेत होते. त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील काहींकडून त्यावेळी त्यांच्या मंत्रिपदाला विरोध झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे आतातरी आपल्याला संधी मिळावी, अशी अपेक्षा थोपटे यांची आहे.
दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची संधी हुकल्याने पटोले यांचे पद किंवा मंत्रिपद मिळावे, यासाठी संग्राम थोपटे फिल्डिंग लावण्यासाठी दिल्लीत पोचले आहेत. आता पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे कोणत्या पदाची जबाबदारी देतात, हे पाहावे लागेल. कारण, थोपटे घराणे कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले घराणे म्हणून ओळखले जाते.
दरम्यान, कोणताही नेता आणि कार्यकर्ता असला तरी काम करण्यासाठी त्याला पद हे आवश्यक असते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या पदाच्या माध्यमातून त्या नेत्याला महत्त्व प्राप्त होत असते. भविष्यात अशा पदावर काम करण्यासाठी संधी मिळाल्यास, त्याचा आनंद होईल, अशी प्रतिक्रिया भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी या वेळी दिली.

