Rohit Patil's support to Manjarde Goan | Sarkarnama

दिनकरदादांच्या मांजर्डेला रोहित पाटील यांचा आधार 

संपत मोरे
रविवार, 17 मे 2020

दिनकर पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मांजर्डे गावातील निराधारांना आधार द्यायला आर. आर. आबांचे सुपुत्र रोहित पाटील पुढे आले आहेत.

पुणे ः माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांचे नेतृत्व उभा राहत असताना त्यांना ज्यांनी खंबीरपणे साथ दिली, त्यामध्ये मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) गावचे दिनकर पाटील होते. आबांच्या निधनानंतरही दिनकर पाटील त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले. आबांचे सुपुत्र रोहित पाटील त्यांना "हंबीरमामा' म्हणायचे. काही दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मांजर्डे गावातील निराधारांना आधार द्यायला रोहित पाटील पुढे आले आहेत. त्यांच्या स्मरणार्थ गावातील निराधार आणि गरीब लोकांना कोरोनाच्या काळात रोहित पाटील यांनी जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. दिनकर पाटील यांच्यानंतर गावातील लोकांना पोरकं वाटू नये; म्हणून रोहित पाटील आधार द्यायला पुढे आले आहेत. 

तासगाव तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांचे 3 मे 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांनी जपलेला जनसेवेचा वारसा आर. आर. प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोहित पाटील जपत आहेत. मांजर्डेतील गरजू व निराधार कुटुंबाना ते जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. 

तासगाव तालुक्‍यात आर. आर. पाटील यांचे नेतृत्व उभा राहिले, ते गावागावांतील सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर. आर. आर. आबांना गावागावांत जी निष्ठावंत लोक मिळाली, या लोकांनी आबांना साथ दिली. आबांच्या आयुष्यात अनेकदा राजकीय वादळे आली, तेव्हा जी काही मोजकी माणसं त्यांच्या सोबत राहिली. त्यामध्ये मांजर्डे गावचे दिनकर पाटील अग्रभागी होते. आबांच्या निधनानंतरसुद्धा त्यांच्या कुटुंबाला धीर देण्यात ते पुढे होते. आबांचे सुपुत्र रोहित पाटील आणि त्यांच्यामध्ये मामा-भाचे असे नाते तयार झाले होते. रोहित त्यांना "हंबीरमामा' म्हणायचे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत अखेरच्या क्षणापर्यंत राहणाऱ्या दिनकर पाटील यांच्या गावातील त्यांचा जनसेवेचा वारसा चालवण्याकरता रोहित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या गावातील गरीब माणसांना सावरण्यासाठी ते पुढे आले आहेत. स्व. आर. आर. आबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मांजर्डेतील गरजू, निराधार कुटुंबीयांना आवश्‍यक ती मदत देण्याचे काम सुरु आहे. 

याबाबत रोहित पाटील म्हणाले,"आर. आर. आबांच्या आकस्मिक निधनानंतर अनेकांनी सोयीच्या भूमिका घेतल्या. चांगल्या काळात सावलीप्रमाणे वावरणाऱ्या लोकांनी आबांच्या निधनानंतर तोंडे फिरवली, आमची साथ सोडली. पण अशा अडचणीच्या काळात आमच्या कुटुंबाच्या पाठीशी जी काही थोडीथोडकी पण जिगरबाज लोक थांबली, त्यात प्रामुख्याने मांजर्डेच्या दिनकरदादांचं नाव घ्यावं लागेल. आमदार सुमनताई पाटील यांना दादा नेहमी सांगत,"वहिनी तुम्ही कशाचीही काळजी करू नका. रोहित माझ्या मुलासारखा आहे. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला लागले तरी हा दिनकर पाटील कुठे कमी पडणार नाही.' हा शब्द दिनकरदादांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत पाळला. आबांसाठी व त्यांच्या पश्‍चात आमच्या कुटुंबासाठी छातीचा कोट करून उभ्या राहणाऱ्या दिनकरदादांच्या पश्‍चात आर. आर. आबांचे कुटुंब नेहमीच त्यांच्या कुटुंबीयासोबत व मांजर्डेच्या गावकऱ्यांसोबत राहील.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख