NCP interviewed forty workers for student wing president post | Sarkarnama

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष तळागाळातून आलेला की घराणेशाहीतला?

उमेश घोंगडे   
गुरुवार, 16 जुलै 2020

मयूर सोनवणे (औरंगाबाद), वेदांशू पाटील (जळगाव), परिक्षीत तळोलकर (नाशिक), राकेश कामळे (नागपूर) आकाश झांबरे (पुणे) व कन्हैया कुमार कदम (नांदेड) यांच्या नावांची चर्चा आहे.

पुणे : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गेल्या आठवड्यात जवळपास चाळीस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. या इच्छुकांमधून कुणा एकाच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ येत्या काही दिवसांत पडण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी देताना पक्ष अध्यक्षपदाची माळ तळातून आलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यात घालणार की घराणेशाही जपणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

अजिंक्यराणा पाटील यांनी हे पद सोडल्याने पक्षाच्या विद्यार्थी आघाडीची जबाबदारी नव्या कार्यकर्त्यावर सोपविण्यात येणार आहे. १० जुलैला यासाठी मुंबईत २५ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्यांना मुलाखतीला येता आले नाही. त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी ऑनलाइन मुलाखती घेण्यात आल्या. एकुण चाळीस जणांमधून एकाची अंतीम निवड करण्यात येणार आहे. प्रादेशिक समतोल साधण्यासाठी एक अध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष दिले जाण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली.

चर्चेतील नावांमध्ये प्रामुख्याने मयूर सोनवणे (औरंगाबाद), वेदांशू पाटील (जळगाव), परिक्षीत तळोलकर (नाशिक), राकेश कामळे (नागपूर) आकाश झांबरे (पुणे) व कन्हैया कुमार कदम (नांदेड) यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय अन्य काही नावांवरदेखील विचार होऊ शकतो, असे या सूत्रांनी सांगितले. नेमणुका करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ताकदवान राजकीय कार्यकर्त्यांचे जाळे, सहकार क्षेत्रात वर्चस्व ही राष्ट्रवादीची ओळख आहे. त्यामुळे पक्षातील महत्वाच्या पदांसाठी साहजिकच प्रस्थापित राजकीय नेत्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने इच्छुक असतात. यावेळीदेखील अनेक प्रस्थापितांचे नातेवाईक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीवर असलेला घराणेशाहीचा शिक्का पुसण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पक्ष तळातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व चाळीस जणांच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्‍नांचा मागोवा घेतल्यास तळातल्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या भूमिकेत ते असावेत असे दिसते. 

पाटील यांनी मुलाखती घेताना प्रत्येकाने राजकारणात असलेले वडील, आई आणि इतर नातेवाईकांच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे काय काम केले याची बारकाईने माहिती घेतली. शिवाय ज्यांच्याकडे राजकीय पार्श्वभूमी नाही. अशा इच्छुकांच्या मुलाखती घेताना पक्षाचे काम विद्यार्थ्यांच्या पातळीवर कसे वाढविणार यावर भर दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी आघाडीच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होताना पक्ष अधिक व्यावहारीक विचार करून निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे. येत्या काळात राज्यात जिल्हा परिषदा, महापालिका तसेच काही नगरपालिाकंच्या निवडणुका आहेत याचा विचार करून ही निवड होणार आहे.

Edited by swarup jankar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख