BJP City President Jagdish Mulik Challenges Guardian Minister Ajit Pawar | Sarkarnama

रस्ता अडवणाऱ्या आमदार-समर्थकांवर अजित पवारांनी कारवाई करावी : जगदीश मुळीक

उमेश घोंगडे
मंगळवार, 28 जुलै 2020

सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील ही समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने मार्गी लावा, अशा सूचना देत स्थानिक कामे करताना आमदारांशी समन्वय ठेवण्याचा सल्ला पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिला होता. विकास कामांच्या आड येणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी आमदार मुळीक यांनी दिला होता

पुणे : शिवणे-खराडी रस्त्याच्या कामात विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या पाठीराख्यांमुळेच अडचण झाली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांमुळेच विमाननगर व वडगाव शेरी या दोन ठिकाणच्या मिळकतींचे भूसंपादन रखडले असून पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार आणि रस्ते अडवणाऱ्या समर्थक कार्यकर्त्यांवर कारवाई करून दाखवावी, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी येथे दिले

मुळीक यांचे पवार यांना थेट आव्हान

सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या नगर रस्त्यावरील ही समस्या सोडवण्यासाठी भूसंपादनाची कामे गतीने मार्गी लावा, अशा सूचना देत स्थानिक कामे करताना आमदारांशी समन्वय ठेवण्याचा सल्ला पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिला होता. विकास कामांच्या आड येणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी आमदार मुळीक यांनी दिला होता. त्याला माजी आमदार मुळीक यांनी जोरदार उत्तर देत पवार यांना थेट आव्हान दिले आहे.

पुण्यातील वडगाव शेरी (नगररोड) भागातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी बैठक झाली.बैठकीला स्थानिक आमदार सुनील टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते. खराडी ते शिवणे नदीकाठच्या रस्त्यासह नगररोडवरील रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. 

यावेळी ते म्हणाले होते की, सार्वजनिक हित लक्षात घेऊन येथील रस्त्यांची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या कामाच्या अनुषंगाने प्रशासन स्तरावरील प्रश्न स्थानिक आमदार, महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने सोडवावेत.नगररोड भागातील उड्डाणपुलाच्या कामाबाबत स्थानिक आमदार व महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा, असे सांगून विकास कामांच्या आड येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना म्हणजे स्थानिक माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना अप्रत्यक्षपणे दिला.

या सदंर्भात बोलताना मुळीक म्हणाले, ''मुळात विधान भवनात झालेल्या बैठकीत विद्यमान आमदारांनी पालमंत्र्यांना योग्य माहिती द्यायला हवी होती.रस्त्यांची कामे आणि भूसंपादनाच्या बाबतीत त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. माझ्या आमदारकीच्या काळात भागातील अनेक रस्ते, उड्डान पूल तसेच शेकडो अंतर्गत रस्ते मंजूर केले आहेत. यातील अनेक कामे मार्गी लागली आहे. गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर वडगाव शेरी मतदारसंघात पाचशे कोटी रूपयांची विकास कामे झाली आहेत. या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात याआधीच्या काळात निधी आलेला नव्हता,'' 

ते पुढे म्हणाले, "विकास कामांसाठी माझ्या स्त:च्या मालकीच्या जागेतील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. विकास कामासाठी मी प्राधान्याने सर्व जागांचे भूसंपादन करून घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, ज्या रस्त्यांच्या कामावरून पालकमंत्री अजित पवार बोलत आहेत. त्या रस्त्याच्या कामात वडगाव शेरी व विमाननगर येथे अडथळा आणण्यात विद्यमान आमदारांचे समर्थक आघाडीवर आहेत. खरोखरच विकास कामे करायची असतील तर पालकमंत्र्यांनी विकास कामात अडथळ्या आणणाऱ्यांवर कारवाई करून दाखवावी.''

Edited BY - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख