उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर होताच राहुल कुलांनी जागवल्या सुभाषअण्णांच्या आठवणी - Announcing the Adarsh ​​Parliamentarian Award to MLA Rahul Kul | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर होताच राहुल कुलांनी जागवल्या सुभाषअण्णांच्या आठवणी

  रमेश वत्रे
मंगळवार, 6 जुलै 2021

हा पुरस्कार मी दौंड तालुक्यातील मतदारांना समर्पित करीत आहे.

केडगाव (जि. पुणे) : दौंडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल कुल यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे २०१७-१८ चा ‘उत्कृष्ट संसदपटू' पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल कुल यांचे वडील दिवंगत आमदार सुभाष कुल यांचा स्मृतिदिन ४ जुलैला होता. त्याच दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला, हा योगायोग ठरला आहे. (Announcing the Adarsh ​​Parliamentarian Award to MLA Rahul Kul)

दौंड तालुक्याचे अनेक पाणी प्रश्न कुल यांनी धसास लावल्याने त्यांना पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाते. मतदारसंघातील नागरिकांना आरोग्य सेवेचा फायदा मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. अष्टविनायक महामार्गासह विविध रस्त्यांची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यासाठी त्यांनी विधानसभेतील विविध आयुधांचा प्रभावीपणे वापर केला. याची दखल राष्ट्रकुल संसदीय मंडळाने घेतली आहे.  

हेही वाचा : देवराम लांडे राष्ट्रवादीत येताना आपल्या विरोधकांनाही सोबत आणणार? 

कुल कुटुंबीयांवर ४ जुलै २००१ रोजी दुःखाचा डोंगर कोसळला. तत्कालीन आमदार सुभाष कुल यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. राहुल कुल तेव्हा शिक्षण घेत होते. २००१ मध्ये पोटनिवडणूक लागली, तेव्हा कुल यांचा विधानसभेसाठी विचार झाला. मात्र, त्यांचे वय कमी पडले; म्हणून सुभाष कुल यांच्या पत्नी रंजना कुल यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. आई आमदार झाल्यानंतर त्यांना विधानसभेच्या कामकाजात त्यांनी मोठी मदत केली.

भीमा पाटस साखर कारखान्याची २००२ मधील निवडणूक कुल यांनी एकहाती जिंकली. हा विषय तेव्हा जिल्ह्यात चर्चेचा झाला होता. कुल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली; परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे तत्कालीन सहयोगी सदस्य आमदार रमेश थोरात व त्यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे. कुल-थोरात दोघेही राष्ट्रवादीत असूनही त्यांचे सूत कधीच जुळले नाही. त्यामुळे २०१४ ला राहुल कुल हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत दौंड भाजपची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिली गेली. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुल यांनी उमेदवारी दिली आणि २०१४ मध्ये कुल यांचा विधानसभेत प्रवेश झाला. त्यांनी विधानसभेत विक्रमी ८०० प्रश्न विचारत दौंड तालुक्यात २०१९ पर्यंत १२०० कोटी रूपयांची विकासकामे केली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कुल (भाजप) विरूद्ध थोरात (राष्ट्रवादी) अशी पुन्हा लढत झाली. या वेळी पुणे जिल्ह्यात भाजपची मोठी पडझड होत असताना एकमेव कुल विजयी झाले. कुल यांचा अवघ्या ७४६ मतांनी हा विजय झाला होता.

  
पुरस्काराबाबत कुल म्हणाले, ‘‘नियतीने डाव साधला आणि सुभाषअण्णा आपल्याला अकाली सोडून गेले. त्यांच्या जाण्याने दौंड तालुका पोरका झाला. आम्हा कुल कुटुंबीयांसमोर अनके यक्ष प्रश्न उभे होते. अनेक संकटे आ वासून उभी होती. सुभाषअण्णांनी घेतलेलं जनसेवेचे व्रत, संघर्षाचे बाळकडू हा वारसा व प्रेरणा घेऊन समाजकारणाची वाटचाल आम्ही सुरु ठेवली.’’

‘‘दौंड तालुक्यातील जनतेने २०१४ मध्ये मला विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्याचवेळी या संधीचे सोने करण्यासाठी जीवाचे रान करण्याचा संकल्प केला. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, युवा सहकाऱ्यांच्या साथीने विकासकामांचा डोंगर उभा केला. संसदीय लोकशाहीची सर्व आयुधे वापरून दौंडचा आवाज विधानसभेमध्ये बुलंद केला. विधानसभेत ८०० पेक्षा जास्त प्रश्न मांडले. शेकडो चर्चांमध्ये सहभाग घेतला. नेहमी सापत्नभाव मिळालेल्या दौंड तालुक्याचा स्वाभिमान, ओळख जपली. हा पुरस्कार मी दौंड तालुक्यातील मतदारांना समर्पित करीत आहे,’’ असे राहुल कुल यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख