आमदारांच्या बक्षीसासाठी नाही...आप्पा, आण्णांसाठी बिनविरोध निवडणूक! - Unopposed elections for Appa not MLA`s Award | Politics Marathi News - Sarkarnama

आमदारांच्या बक्षीसासाठी नाही...आप्पा, आण्णांसाठी बिनविरोध निवडणूक!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

गौळाणे, अंबे बहुला व रायगड नगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. या ग्रामस्थांनी आम्ही आमदारांसाठी नव्हे तर शिवसेनेचे शिवाजी आप्पा व युवा नेते अजिंक्य चुंभळे यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध केल्याचे सांगितले.

नाशिक : तालुक्यातील गौळाणे, अंबे बहुला व रायगड नगर या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. या ग्रामस्थांनी आम्ही आमदारांसाठी नव्हे तर शिवसेनेचे शिवाजी आप्पा व युवा नेते अजिंक्य चुंभळे यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध केली. ग्रामस्थांच्या या पावित्र्याने नवा राजकीय ट्वीस्ट तयार झाला आहे.

देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी मतदारसंघातील ज्या गावांची निवडणूक बिनविरोधी होईल त्या गावांना पंचवीस लाखांचा विकास निधी देण्यार असल्याचे जाहिर केले होते. या मतदारसंघात तीन गावांत निवडणुका बिनविरोध झाल्याने त्यांना निधी देणार असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले होते. मात्र ही बातमी येताच आज या गावांतील बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी वेगळीच भूमिका सांगितले. 

यासंदर्भात गौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंभळे म्हणाले, मी स्वतः गौळाणे  गावचा सरपंच आहे. या गावात वर्षानुवर्षे आम्ही रहिवासी आहोत. त्यामुळे गावातील सर्वांना बरोबर घेऊन बिनविरोध निवडणूक केली आहे. त्याचबरोबर अंबे बहुला, आणि रायगड नगर या दोन्ही गावांत स्वतः लक्ष घालून निवडणूक बिनविरोध केली. त्यासाठी शिवसेना नेते, माजी नगरसेवक शिवाजी आप्पा चुंभळे व मी स्वतः ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. ही सर्व गावे आमच्या कुटंबासारखी आहेत. गेली अनेक वर्षे येथे आमचे नाती-गोती, भाऊबंद व आमचे घर असल्यासारखेच संबंध आहेत. येथून अनेक वर्षे आमच्या पाठींब्यानेच पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य निवडून येतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली हे आमदारांनी बक्षीस जाहिर केल्याने नव्हे तर आप्पा व आण्णांच्या व्यक्तीगत संबंध व आपुलकीतून झाली. 

अजिंक्य चुंभळे यांनी अतिशय कमी कालावधीत या पंचक्रोशीत युवा नेतृत्व आपला जम बसविला आहे. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार असतो. त्यामुळेच अन्य काही नाही तर आमच्यासाठी आप्पा आणि आण्णा हेच सर्व काही आहेत असे सर्व ग्रामस्थ म्हणतात असे चुंभळे म्हणाले. 
या निवडणुकीत रायगड नगर ग्रामपंचायतचे बिनविरोध सदस्य असे, रमेश गुलाब पारवे, रुख्मिणी रामू ठाकरे, संजय सखाराम लचके, काळुबाई सुभाष शीत, आवाडीबाई रामू गोहिरे, सुनीता रामनाथ गोहिरे, कैलास काशीनाथ गोहिरे. तसेच आंबे बहुलाचे बिनविरोध सदस्यांत वर्षा अंतु गवारी, रमेश बळवंत ढगे, संगीता बाळू यादव, लक्ष्मण विनायक सुपे, सुमनबाई अशोक देशमुख, योगेश माणिक गडकरी, पांडुरंग विठोबा गवारी, अक्षदा किरन गवारी,  कविता राजेंद्र ढगे.

या प्रक्रीयेत आंबे बहुलाच्या ग्रामसेवक श्रीमती रत्ना हौशीराम भोजणे, बाजीराव चुंभळे,  गौळाणे ग्रामपंचायतीचे सदानंद नवले (सरपंच), जिल्हा परिषद सदस्य राज चारस्कर, प्रशांत देशमुख, किरण गवारी, तानाजीभाऊ गायकर दत्तूभाऊ ढगे यांनी सहकार्य केले.

Edited by Sampat Devgire 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख