प्रणव पवार आले...ओणे ग्रामपंचायत बिनविरोध करुन गेले! - Pranav pawar initiative for One Unopposed election | Politics Marathi News - Sarkarnama

प्रणव पवार आले...ओणे ग्रामपंचायत बिनविरोध करुन गेले!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 जानेवारी 2021

गावातील युवकांशी चर्चा केली. सर्वच राजकीय गटांची मोट बांधली आणि हे करतांना आधी पवार कुटुंबातील सदस्यांना माघार घेण्यास सांगत इतरांना संधी दिली. त्यामुळे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ओणे येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली.

नाशिक : प्रस्थापित, कर्तुत्ववान नेत्यांनी प्रयत्न करुनही स्वतःच्या गवातील राजकारणात त्यांना हात टेकावे लागतात. ओणे (ता. निफाड) हे गावही त्यातलेच. या गावात आजवर कधीच बिनविरोध निवडणूक झाली नव्हती. मात्र यंदा चमत्कार झाला. कारण ठरले युवा नेते प्रणव पवार यांचा पुढाकार. यानिमित्ताने हे गाव अन् प्रणव पवार दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. 

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस, कर्मवीर माजी खासदार (कै) डॅा वसंतराव पवार याच गावातील. डॅा पवार यांनी विविध निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना यश आले नव्हते. ओझर आणि कसबे सुकेने या दोन मोठ्या व राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेल्या गावांमध्ये हे निफाड तालुक्यातील लहानसे गाव. त्याचा प्रभाव किंवा अन्य कारणे यामुळे किंवा कसे मात्र येथील निवडणूक कधीच बिनविरोध झाली नव्हती. यंदा गावातील इच्छुकांनी विनंती केल्याने युवा नेते प्रणव पवार यांनी पुढाकार घेतला. 

गावातील युवकांशी चर्चा केली. सर्वच राजकीय गटांची मोट बांधली आणि हे करतांना आधी पवार कुटुंबातील सदस्यांना माघार घेण्यास सांगत इतरांना संधी दिली. त्यामुळे गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ओणे येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. ग्रामस्थ याचे सर्व श्रेय प्रणव वसंतराव पवार यांना देतात. माघारीच्या धावपळीत त्याची फारशी कुठे चर्चा झाली नाही. मात्र आज ही बातमी आल्यावर त्याची जिल्हाभर चर्चा झाली. प्रणव पवार गोदावरी नागरी सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. मराठा विद्या प्रसार समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणतही ही बातमी गांभिर्याने घेतली गेली.  

श्री. पवार यांनी पुढाकार घेऊन काही वॅार्डात अडचणीच्या नेत्यांची माघार घेण्यासाठी त्यांची मने वळवली. त्यासाठी प्रारंभी आपल्याच कुटुंबातील सविता रमेश पवार व संगीता उद्दव पवार यांची माघार घेतली. त्यामुळे यंदा पवारांच्या या गावात ग्रामपंचायतीत कोणीही पवार नाही. या वॅार्डातून कौसाबाई केशव हळदे यांनी बिनविरोध निवडून दिले. इतरांसाठी आपल्या कुटुंबाची माघार घेण्याची त्यांची कृती गावात कौतुकाचा विषय बनली. पतसंस्थेचे चेअरमन रमेश घुगे, शरद हळदे, सोसायटीचे चेअरमन सोमनाथ हळदे, सुरेश घुगे, विजय घुगे, दिनकर बोडके, पोलीस पाटील रंगनाथ हळदे, राजाराम हळदे, शांताराम कातकडे आदींनी त्यांना सहकार्य केले. 

गावातील जुन्या-जाणते व युवक एकत्र आल्याने ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आले. बिनविरोध आलेले उमेदवार असे, कौशाबाई केशवराव हळदे (वॅार्ड 1), रोशन सुरेश कातकाडे, माया भाऊसाहेब कोकाटे (वार्ड 2), वैशाली विजय घुगे, शांताराम सुदाम निसाळ, निर्मला सुरेश पवार (वार्ड 3), गोविंद सखाराम हळदे, संजय संपत कातकडे, सोनुबाई प्रभाकर निरभवने. ही निवड होताच गावात जल्लोष करण्यात आला. निर्वाचीत सदस्यांनी गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम करण्याची ग्वाही दिली. 
Edited by Sampat Devgire

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख