यतीन कदम यांच्या गनीमी काव्यापुढे अनिल कदम यांची पिछेहाट !

राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत युवा नेते यतीन कदम यांनी दहा जागा बिनविरोध करुन ओझर ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. त्यामुळे शिवसेना नेते माजी आमदार अनिल कदम यांची घरच्या राजकीय मैदानावर पिछेहाट झाली.
Anil Kadam- Yatin Kadam
Anil Kadam- Yatin Kadam

ओझर : गेली दशकभर ओझर गाव निफाड तालुक्याचे राजकीय केंद्र राहिले आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते आणखी बळकट झाले. राष्ट्रवादीशी पडद्यामागे हातमिळवणी करीत युवा नेते यतीन कदम यांनी निकालाआधीच गनिमी काव्याने दहा जागा बिनविरोध करुन ओझर ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखले. त्यामुळे शिवसेना नेते माजी आमदार अनिल कदम यांची घरच्या राजकीय मैदानावर पिछेहाट झाली. 

सोमवारी ओझर ग्रामपंचायत निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी युवा नेते यतीन कदम यांनी सतरा पैकी दहा जागा बिनविरोध करण्याची जादू केली. विशेष म्हणजे यामध्ये माजी आमदार अनिल कदम व यतीन कदम या दोघांच्या घरच्या प्रभाग सहामध्ये भाऊबंदकीचा खेळ चांगलाच रंगला. पारंपारीक विरोधक अक्कर कुटुंबातच फुट पाडून यतीन यांनी विरोधकांच्या घरातून उमेदवार मिळवला. महिला गटात प्रतिस्पर्धी महिला उमेदवाराला आपलेसे करीत शेवटच्या क्षणी पत्नी जान्हवी यांची माघार घेऊन या प्रभागाचा ताबा मिळवला. अनिल कदम यांच्या समर्थकांना धावाधाव करुनही या हक्काच्या, घरच्या प्रभागात उमेदवार न मिळाल्याची नामुष्की स्विकारावी लागली. गंमत म्हणजे ओझरचा बालेकिल्ला राखण्यासाठी अनिल कदम यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादी कॅाग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्याशीही यतीन कदम यांची पडद्यामागे हातमिळवणी झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे देखील मैदानात आलेच नाही. त्यातून विधानसभेला बनकर यांच्या विजयाला हातभार लावल्याची परतफेड यतीन कदम घेतली. एकंदर निफाड तालुक्याचे राजकीय केंद्र असलेला ओझरचा गड निवडणुकीच्या राजकीय खनाखनीच्या आधीच माजी आमदार कदम यांना गाफील ठेवत यतीन कदम यांनी ताब्यात घेतला. 

ओझर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवड झालेल्या दहा सदस्यांनी सायंकाळी जल्लोष करीत गावात यतीन कदम यांच्यासह मिरवणूक काढली.  यतीन कदम यांच्या नेतृत्वाखालील नागरिक आघाडीचे बिनविरोध उमेदवार असे, सचिन प्रभाकर आढाव, मोनाली सागर शेजवळ, चंदा अनिल गवळी (वॅार्ड क्र. 1), रूपाली निलेश भडके, रूपाली युवराज शेळके (वार्ड क्र. 2), नरेंद्र प्रेमराज गायकवाड, अत्तार सायरा इक्बाल (वार्ड क्र. 3), योगेश रामचंद्र आहिरे, मनिषा गिरजाकांत वलवे (वार्ड क्र. 4), प्रमिला किसन रासकर (वार्ड क्र. 6).

85 वर्षाचे रेकॅार्ड मोडले
जिल्हयातील सर्वाधीक राजकिय चर्चेचा विषय व सगळ्यांचेच लक्ष लागलेल्या ओझर ग्रामपालीकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांना निवडणुकीच्या तोंडावर घातलेला नगरपरिषदेचा घाट लक्षात घेता जोर का झटका दिला आहे. यतीन यांनी ग्रामपालीकेच्या 85 वर्षाच्या इतिहासात पाहिल्यांदाच एवढे बिनविरोध सदस्य निवडून आणले आहेत. माघारीच्या पुर्वसंध्येला धर्मवीर संभाजी चौकात नागरिकांची सभा घेऊन आपली भुमिका मांडली. 

अनिल कदम झोपले होते का?
यतीन कदम सभेत म्हणाले, `जर माजी आमदार अनिल कदम यांची गेल्या दहा वर्षात सत्ता होती. आत्ताही मुख्यमंत्री त्याच्याच पक्षाचे आहेत. तर मग नगरपरिषदेची घोषणा करुन निवडणुकीच्याच वेळी उतारावरील चालत्या गाडीला उटी का लावून ठेवली?. याआधी ते झोपले होते का? असा सवाल केला. त्यांच्या काळात केलेल्या कामाचाही लेखाजोगा सादर केला.  नगरपरिषद उद्या का येईना किंवा ग्रामपालिका का राहिना परंतु ग्रामपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीला सामोरे जाणारच असा विडाच उचलला होता. त्यामुळेच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असावी. यतीन कदम यांच्या कामाची पावती व विश्वास म्हणून नागरिक आघाडीच्या दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
...
लवकरच ओझरला नगरपरिषद होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक खुप गांभिर्याने घेत नाही. जनतेचा विश्वास आमच्यासोबत आहे. त्यामुळे नगरपरिषदेवर शिवसेनेचाच झेंडा फडकेल.
- अनिल कदम, माजी आमदार.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com