Dr. Shrikant Jichkar's Son Yadnyawalka Jichkar Enters Active Politics | Sarkarnama

१६ वर्षांनंतर श्रीकांत जिचकारांचे वारसदार राजकारणात सक्रीय

संपत मोरे
सोमवार, 13 जुलै 2020

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ श्रीकांत जिचकार यांचे सुपूत्र याज्ञवल्क्य जिचकार यांना प्रदेश सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच संशोधन विभागाचे मुख्य समन्वयकपद त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ श्रीकांत जिचकार यांचे सुपूत्र याज्ञवल्क्य जिचकार यांना प्रदेश सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. तसेच संशोधन विभागाचे मुख्य समन्वयकपद त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे. भारतीय राजकारणात बुद्धिवादी नेते म्हणून ओळख असलेल्या जिचकार यांचे वारसदार राजकारणात सक्रिय झाले आहेत. 

श्रीकांत जिचकार यांच्या निधनानंतर १६ वर्षांनी त्यांचे वारसदार काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आहेत. त्यांच्याकडे प्रदेश सचिव अशी जबाबदारी देत संशोधन विभागाचे मुख्य समन्वयक पद त्यांना दिले आहे. श्रीकांत जिचकार यांची बुद्धिवादी नेता म्हणून सर्वत्र  ओळख  होती. त्यांनी 'आय ए एस' पदाचा  राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला होता.

त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४२  एकूण २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं मिळवली होती. त्यांनी आमदार, मंत्री म्हणून राज्यात काम केले होते. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द लक्षवेधी ठरली होती. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर १६ वर्षांनी त्यांचे सुपूत्र याज्ञवल्क्य यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. जिचकार हे विधी शाखेचे पदवीधर आहेत. ते डॉ श्रीकांत जिचकार फौंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. श्रीकांत जिचकार यांनी स्थापन केलेल्या सांदीपानी संस्थेच्या विश्वस्तपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या टीममध्ये जिचकार यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी यांचे त्यांनी आभार मानले आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख