Sachin Pilot Supporter Sanjay Jha has Pune Mumbai Connection | Sarkarnama

सचिन पायलट यांना पाठिंबा देणारे संजय झा यांचे काय आहे पुणे-मुंबई कनेक्शन?

मंगेश कोळपकर
बुधवार, 15 जुलै 2020

संजय झा मूळचे मुंबईच. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले आहे. पुणे परिसरातील एका उद्योजक कुटुंबाचे ते जावई आहेत. साहजिकच त्यांचा पुणे परिसरातही वारंवार वावर असतो.  संजय झा कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. काॅर्पोरेट ट्रेनर होण्यापूर्वी त्यांनी  क्रिकेटशी संबंधित एक डॉट कॉम कंपनी स्थापन केली होती. ती  स्थिरावल्यावर त्यांनी चांगल्या रकमेला विकून टाकली

पुणे : राजस्थानमधील राजकीय घडामोडींमध्ये सचिन पायलट यांच्यामागे गेल्याबद्दल कॉंग्रेसने निलंबित केलेले राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांचे मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळेच त्यांच्या निलंबनाबद्दल आश्चर्य व्यक्त होत असले तरीही हे होणारच होते, अशीही प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

झा मूळचे मुंबईच. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले आहे. पुणे परिसरातील एका उद्योजक कुटुंबाचे ते जावई आहेत. साहजिकच त्यांचा पुणे परिसरातही वारंवार वावर असतो.  संजय झा कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. काॅर्पोरेट ट्रेनर होण्यापूर्वी त्यांनी  क्रिकेटशी संबंधित एक डॉट कॉम कंपनी स्थापन केली होती. ती  स्थिरावल्यावर त्यांनी चांगल्या रकमेला विकून टाकली. मुंबई- पुण्यासह देशाच्या प्रमुख शहरांतील कॉर्पोरेट क्षेत्रात संजय झा यांचे चांगले नेटवर्क आहे. 

प्रभावी व्यक्तीमत्त्व, उत्तम वक्ते

प्रभावी व्यक्तिमत्त्वाबरोबरच ते उत्तम वक्तेही आहेत. मुंबईतील कॉर्पोरेट क्षेत्रात झा काम करत होते त्याच वेळी त्यांची ख्याती कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोचली.  ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध झालेल्या प्रियांका चर्तुर्वेदी यांचेही नाव त्याच काळात गांधी यांच्यापर्यंत पोचले होते. राहुल गांधींनी आपल्या टिमकडून या दोघांची खातरजमा करुन घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राहुल यांनी  २०१२ मध्ये पश्चिम भारतासाठी महाराष्ट्रातून तीन प्रवक्ते निवडले होते. त्यात झा, चर्तुवेदी आणि पुण्याचे अनंत गाडगीळ यांचा समावेश होता. 

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वाढले होते वजन

पश्चिम भारतात राष्ट्रीय स्तरावर त्यांनी पक्षाची भूमिका मांडायची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.  राहुल गांधी यांनीच खुद्द जबाबदारी दिल्यामुळे साहजिकच झा यांचे महाराष्ट्रातील कॉंग्रेसमध्ये वजन वाढले. कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांचे नेटवर्कचीही दखल राज्यातल्या नेत्यांना घ्यावी लागली. त्यातून पुढे त्यांची प्रोफेशनल कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. झा यांचा आलेख सतत चढता राहिला आणि त्यातून पक्षाच्या हायकमांडपर्यंत ते पोचले. त्यामुळेच त्यांच्याकडे आपसूकच राष्ट्रीय प्रवक्तेपदही आले.

काल केली होती पाठिंब्याची ट्वीट

परंतु, अलिकडील काळात काही अन्य नेत्यांना राष्ट्रीय  प्रवक्ते म्हणून अधिक संधी दिली गेल्याने झा नाराज झाले होते. या नाराजीपोटीच त्यांनी सचिन पायलट यांची यांच्या बाजूला जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी कॉंग्रेसच्या वर्तुळात चर्चा आहे. 'सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री करावे', 'अशोक गेहलोत ३ वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री होते. आता त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी देण्यात यावी', ' २०१३- २०१८ या काळात पक्षाच्या विधानसभेतील जागा २१ वरून १०० पर्यंत सचिन पायलट यांनी नेल्या, त्याचे त्यांना हेच फळ का?', 'ज्योर्तिराजे शिंदे, सचिन पायलट यांच्यानंतर आता पुढे कोण ?' असे ट्वीट झा यांनी मंगळवारी सातत्याने केली होती. त्यांना नेटिझन्सकडून प्रतिसादही अपेक्षेप्रमाणेच चांगला मिळाला. 

काल झाली झा यांची हकालपट्टी

त्यामुळेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार महाराष्ट्र  प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे संजय झा यांना पक्षातून निलंबित केले. तसे पत्र त्यांनी मंगळवारी प्रसिद्ध केले. वास्तविक झा यांना निलंबित करण्यात आले आहे, बडतर्फ नाही, याकडेही एका नेत्याने लक्ष वेधले आहे. झा यांनी माफी मागून चूक सुधारली तर, ते पुन्हा पक्षात सक्रीय होऊ शकतात, असाही दावा या नेत्याने केला. संजय झा आता राज्यातील एका युवा नेत्याच्या मागे आपले पाठबळ उभे करण्याच्या  तयारीत असल्याची चर्चा आहे. 

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख