how Amol Mitkari become MLC in one year after joining NCP | Sarkarnama

वर्षातच आमदार झालेल्या आमदार मिटकरींना आता यासाठी अभ्यास सुरू केलाय!

सोनाली शिंदे
गुरुवार, 21 मे 2020

राष्ट्रवादीने नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत संधी दिली आहे. शिवव्याख्याते असलेल्या अमोल मिटकरींचा हा प्रवास!

 मुंबई : “राष्ट्रवादी पक्षाच्या संक्रमणाच्या काळात मी पक्षाचा प्रचार केला. अनेक प्रस्थापित नेते पक्ष सोडून जात असताना, राष्ट्रवादीला तितकसं यश मिळालं नसताना प्रवाहाच्या विरोधात मी उडी मारली. त्याचचं फळ म्हणून मला आमदारकी मिळाली,” असे मत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार, शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. नुकतीच त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली.

“अजितदादांनी दोन शब्द पाळले, एक म्हणजे शिवतारेंना आमदार होऊ न देणं आणि दुसरे म्हणजे मला आमदार करणे...माझ्या आमदारकीबद्दलची घोषणा त्यांनी पाच महिन्यांपूर्वी पुण्याच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली होती.” अशी माहिती मिटकरींनी दिली. यावेळी त्यांनी विधान परिषदेत आपल्या वक्तृत्वाने जनहिताचे मुद्दे मांडण्यासाठी तयारी सुरु असल्याचेही सांगितले. शरद पवारांनी याबद्दल मला मार्गदर्शन केले असून उत्कृष्ट संसदपटू बनण्यासाठीचा अभ्यास सुरु केल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या उपाययोजनांवरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांवरही त्यांनी टीका केली. कोरोनासंदर्भात राज्यात सरकारला अपयश येत असल्याचे निवेदन भाजपने राज्यपालांकडे दिले. असे असेल तर मग केंद्रात नरेंद्र मोदींनी किती यश आले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने राज्यव्यापी शिवस्वराज्य यात्रा काढली होती. भाजपविरोधात लढण्यासाठी ही यात्रा महत्त्वाचाी ठरली होती. डाॅ अमोल कोल्हे व अमोल मिटकरी हे त्यातले महत्त्वाचे वक्ते होते. केवळ एकाच वर्षाच्या पक्षीय राजकारणानंतर अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळाली. सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना अनेकदा आमदारकी मिळाली.पण केवळ वक्तृत्वाच्या जोरावर आमदारकीपर्यंत पोहोचण्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. त्याबद्दल बोलताना त्यांनी या संधीबद्दल भाष्य केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख