पुणे जिल्ह्यात लॅंड माफियांना सरळ करणारे पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर

कसाब याला आॅर्थर रेडमधून येरवडा कारागृहात फाशीच्या स्तंभावर पोहचविण्यासाठी जे आॅपरेशन एक्स या नावाने मोहीम आखली होती त्यात पाटील यांना महत्वाचा सहभाग होता.
Pravin Patil
Pravin Patil

पुणे : महाराष्ट्रातील 21 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यात पुण्याचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे आणि नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त (गुन्हे) यांचा समावेश आहे. पाटील यांना गुणवत्तापूर्व सेवेसाठी हे पदक मिळाले आहे. मुंबईवर 26/11 रोजी हल्ला करणारा दहशतवादी कसाब याला आॅर्थर रेडमधून येरवडा कारागृहात फाशीच्या स्तंभावर पोहचविण्यासाठी जे आॅपरेशन एक्स या नावाने मोहीम आखली होती त्यात पाटील यांना महत्वाचा सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील विशेषतः हवेली तालुक्यातील वाळू आणि लॅंडमाफिया यांना आळा घालण्याची मोठी कामगिरी बजावली होती. अशा गुन्हेगारांची धिंड काढून त्यांनी लोकांच्या लुबाडलेल्या जमिनी परत मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते.  

श्री. पाटील यांनी १९९६ साली सरळसेवा पोलीस उपअधीक्षक या पदावर पोलीस सेवेत प्रवेश केला. लातूर व हवेली (पुणे ग्रामीण) या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी त्यानंतर बारामती येथे अपर पोलीस अधिक्षक, नानवीज (दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य, मुंबई येथे परिमंडळ-१२ चे पोलीस उपायुक्त, मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र विधान मंडळ येथे मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर काम केलेले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर या पदावर १९९९ ते २००२ या कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हे उघडकीस आणणे, गुन्हयांना प्रतिबंध करणे व कायदा सुव्यवस्था सांभाळणे यात त्यांचा उपविभाग जिल्हयात प्रथम क्रमांकावर ठेवला होता.

हवेली (पुणे ग्रामीण) या उप विभागात २००२ ते २००६ या कालावधीत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकीक मिळविला. पुणे जिल्हयातील जमौनी हडप करणारे कुख्यात आरोपी व वाळु माफीया यांचे विरूध्द त्यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदयाखाली कारवाई करून आरोपीची दहशत संपवली होती.

सन २००६ ते २००९ या कालावधीत त्यांची अपर पोलीस अधीक्षक, बारामती, जि. पुणे (ग्रामीण) या पदावर बारामती पहिले अपर पोलीस अधिक्षक म्हणुन नियुक्ती झाली. नानवीज (दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून त्यांनी २००९ ते २०१२या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली. सदर प्रशिक्षण केंद्रासाठी त्यांनी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजुर करून अनेक वर्षाचा तेथील पाण्याचा प्रलंबित प्रश्न सोडविला. सदर कालावधीत अंत्यत दुर्लक्षित असे प्रशिक्षण केंद्र त्यांनी महाराष्ट्रात क्रमांक एकचे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र बनविले. सदर कालावधीत नागपुर, जळगाव व कोल्हापुर येथील एकुण १५०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी पोलीसांना गुणात्मक प्रशिक्षण दिले.

मुंबईतील परिमंडळ-१२ येथे पोलीस उपायुक्त म्हणुन काम केले. सदर कालावधीत परिमंडळातील कायदा व सुव्यस्था परिस्थीति उत्कृष्टपणे हाताळली व अनेक गंभीर गुन्हे व क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले. २०१२ सालात नोव्हेंबर महिन्यात 'ऑपरेशन एक्स' मध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.

मुंबई गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त, अंमलबजावणी या पदावर २०१४ ते २०१७ या कालवधीत काम करीत असताना पोलीस उपायुक्त (प्रतिबंध) या पदाचाही अतिरीक्त कार्यभार सांभाळला. सदर कालावधीत (२०१४-२०१५) त्यांनी मुंबई शहरातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांचे व सहकार्याचे मदतीने विशेष मोहिम राबविली. सदर मोहिमेत एकुण ८३८१ हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात यश आले.

पोलीस उपायुक्त, अंमलबजावणी, गुन्हे शाखा मुंबई येथे कार्यरत असताना त्यांनी बाल न्याय अधिनियम व अनैतिक मानवी वाहतुक (प्रतिबंध) अधिनियम या कायदयांची परिणामकारक अंमलबजावणी केली. त्यात ३५४१ बालकांची व ६०० महिलांची वेगवेगळया प्रकारच्या शोषणातून मुक्तता केली. महाराष्ट्र विधानमंडळ येथे मुख्य सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असताना त्यांनी अत्यंत कडक सुरक्षा विषयक उपाययोजना राबविल्या.

सध्या पाटील हे पोलीस उपायुक्त (गुन्हे), नवी मुंबई या पदावर कार्यरत असून नवी मुंबईतील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखेने महत्वाची भूमिका बजावली आहे. तसेच गुंतवणूकदारांना फसवणुक करण्याच्या उद्देशाने अधिक परतावा देण्याचे आमीष दाखवून फसव्या गुंतवणूक योजना चालविण्याच्यांवर आतापर्यंत पाच ठिकाणी छापे घालुन अशा फसवणुक करणाऱ्या गुन्हेगारांविरूध्द यशस्वी कारवाया केल्या आहेत.

आतापर्यंत वेळोवेळी करण्यात आलेली उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन व सोबतच्या अधिकारी व अंमलदार यांचे सहयोगामुळे शक्य झाल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातले राष्ट्रपती पोलिस पदक विजेते  - डॉ. रविंद्र शिसवे, सहपोलिस आयुक्त पुणे
प्रविणकुमार पाटील, पो. उपायुक्त, नवी मुंबई
वसंत जाधव, एस. पी. भंडारा
कल्पना गाडेकर, अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई
संगिता शिंदे- अल्फान्सो, डेप्यु. एस.पी. जात पडताळणी समिती
दिनकर मोहिते, पोलिस इन्स्पेक्टर, सिबिडी, बेलापूर
मेघ:श्याम डांगे, पो. इन्स्पेक्टर,  अक्कलकुवा, नंदुरबार
मिलिंद देसाई, पोलिस इन्स्पेक्टर, शेड्युल ट्राईब स्क्रूटिनी कमिटी
विजय डोळस, पोलिस इन्स्पेक्टर, निजामपुरा पो. स्टेशन
रविंद्र दौंडकर, पोलिस इन्स्पेक्टर, वाशी
तानाजी सावंत, पोलिस इन्स्पेक्टर, कोल्हापूर
मनीष ठाकरे, पोलिस इन्स्पेक्टर, अमरावती शहर
राजू बिडकर, पोलिस इन्स्पेक्टर,डि.बी. मार्ग पोलिस स्टे. मुंबई
अजय जोशी, पोलिस इन्स्पेक्टर, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई
प्रमोद सावंत, पोलिस इन्स्पेक्टर, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई
भगवान धबडगे, पोलिस इन्स्पेक्टर, देगलुर, नांदेड
रमेश कदम, पोलिस इन्स्पेक्टर, खंडणी विरोधी पथक, ठाणे
रमेश नागरूरकर, राखीव पो. दल, मुख्यालय, बुलडाणा
सूर्यकांत बोलाडे, असि. पो. सब इन्स्पेक्टर, रेल्वे पोलि, घाटकोपर
लीलेश्वर वारहडमरे, असि. पो. सब इन्स्पेक्टर, चंद्रपूर
भारत नाले, असि. पो. सब इन्स्पेक्टर, वाहतूक शाखा, सातारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com