Vasantrao Naik who made the state self-sufficient in food grains | Sarkarnama

अन्नधान्यात राज्याला स्वयंपूर्ण करणारे वसंतराव नाईक

महेश जगताप
बुधवार, 1 जुलै 2020

नाईक हे अनेक वर्षे पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वसंतराव नाईक यांना आधीच्या इतर सर्व नेतेमंडळींना डावलून लालबहादूर शास्त्री यांच्या शिफारशीनुसार काँग्रेस पक्षातर्फे आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली व निवडून आल्यानंतर 1952 मध्ये त्यांना त्या वेळच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नेमले गेले.

``पुढच्या दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला जाहीर फाशी द्या, असं 1972 दुष्काळात म्हणणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांची आज जयंती.  नाईक हे सामान्य शेतकरी कुटुंबातील. यवतमाळ ह्या मागसलेल्या जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या छोटेखानी गावातील एका बंजारा कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

नाईक यांच्या आईवडिलांना आपली पोरं शिकली पाहिजेत, त्यांनी नाव कमवावं, असं मनोमन वाटे. गावात शाळा नसतानाही नाईक यांना दूरच्या शाळेत ठेवलं. सहा किलोमीटरचा प्रवास चालत करावा लागे. पावसाळ्यात ओढ्याला पाणी येई तेव्हा त्यांची तारांबळ होई. ते लहाणपनी बंजारा वेशभूषा करीत असल्याने शाळेतील इतर मुलांनी केलेली टिंगलटवाळी त्यांना सहन करावी लागली. त्यानंतर पुढे माध्यमिक व उच्चशिक्षण त्यांनी अमरावती, नागपूर या ठिकाणी घेतले. 

बंजारा समाजातील पहिले वकिल

१९३७ मध्ये वयाच्या चोविसाव्या वर्षी नाईकांनी एलएलबी ची पदवी प्राप्त केली व ते बंजारा समाजातील पहिले वकील बनले. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली केली. मनमिळाऊ व गरीब लोकांना मदत करण्याच्या स्वभावमुळे  थोड्या दिवसात लोकप्रिय वकील म्हणून नाईक प्रसिद्धीस आले. आंतरजातीय विवाह केल्यामुळे काही दिवस त्यांना बंजारा समाजाने वाळीतही टाकले होते.

वाचनाच्या छंदामुळे त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव पडला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण झाली. त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात आपल्या गावातूनच केली. बंजारा समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी यांना विरोध करत आपले पुसद गावे आदर्श बनवले. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे नव्हे तर अभ्यासाचे विषय होते.

नाईक अनेक वर्ष पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. 1952 मध्ये देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत वसंतराव नाईक यांना आधीच्या इतर सर्व नेतेमंडळींना डावलून लालबहादूर शास्त्री यांच्या शिफारशीनुसार काँग्रेस पक्षातर्फे आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली व निवडून आल्यानंतर 1952 मध्ये त्यांना त्या वेळच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नेमले गेले.

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी

यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर  दादासाहेब कन्नमवार हे मुख्यमंत्री झाले पण त्यांची कारकीर्द अतिशय अल्पकालीन ठरली. १९६३ मध्येच त्याच वेळी काँग्रेस विधिमंडळाची बैठक होऊन वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली.
 
पुढे नाईक यांनी १९७५ पर्यँत तब्बल बारा वर्षे ते मुख्यमंत्री म्हणून राहिले. आजही त्यांचे रेकॉर्ड कोणालाही मोडता आला नाही. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले .विशेषतः शेतकऱ्यांबद्दल अधिक जिव्हाळा असल्याने त्यांनी कापूस ,ज्वारी, भात या पिकांची एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणी केली. महाराष्ट्राच दुधाच्या बाबतीतही  गुजरातवर असणार अवलंबून त्यांनी  कमी केलं. त्यावेळचे कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांच्या सहकार्याने वसंतरावांनी संकरित गाई खरेदी करून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज व पुरवठा करण्याची व्यवस्था केली. महाराष्ट्रात धवलक्रांती व हरितक्रांती सुद्धा घडवण्याचे श्रेय वसंतराव नाईक यांना जाते. ग्रामीण रोजगार हमी व गरीब हटावो या योजनांची अंमलबजावणी त्यांच्याच काळात झाली. त्यांच्या कारकिर्दीत असंख्य विहिरी, तलावाचे खोदकाम झाले. ग्रामीण भागात रस्ते झाले, शेतीला आधुनिक स्वरूप देऊन त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना केली. कमाल जमीन धारणा कायद्याची अंमलबजावणी ही त्यांच्याच कारकिर्दीत झाली. वसंतरावांनी दारूबंदी विषयक धोरणाचा व्यवहार्य विचार करून दारूबंदीचे धोरण बदललं. दारूविक्री खुली केली. यामध्ये विनोबा भावे यांच्यासारख्या नेत्यालाही धोरण समजावून सांगण्यात यश मिळवले. आज साखर कारखान्यांमध्ये दारूनिर्मिती होते यालाही नाईक यांनीच १९७२ साली संमती दिली होती.

अत्यंत सर्जनशील, नम्र, सुसंस्कृत, न रागवता आदळाआपट न करता काम करणारा ,शांत स्वभावाचा, तसेच हसतमुख असणारा हा नेता इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर उत्तम संबंध निर्माण करून खासदार म्हणून संस्थेने आपली छाप पाडली होती. फावल्या वेळेत शेतीत लक्ष घालणे, पत्ते खेळणे, उत्तम  पोषाख घालण्याचा त्यांना शौक होता. पाईप ओढणार हा एकमेव मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. पण शेतीत लक्षणीय सुधारणा करणारा म्हणून राज्यातील कृषीक्रांतीचे श्रेय त्यांना जाते. त्यामुळेच एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख