रावसाहेब दानवेंनी दिल्लीतल्या नेत्यांना असा मेसेज दिला की त्यांचे पद शाबूत राहिले... - Raosaheb Danave message to Delhi leaders kept him Modi ministry | Politics Marathi News - Sarkarnama

रावसाहेब दानवेंनी दिल्लीतल्या नेत्यांना असा मेसेज दिला की त्यांचे पद शाबूत राहिले...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 जुलै 2021

मोदी मंत्रीमंडळ विस्ताराच्या अनेक कहाण्या... 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी मंत्रीमंडळाचा (Modi Cabinet Expansion) विस्तार झाला तरी अद्याप त्यामागचे नाट्य संपलेले नाही. बारा नावे कशी वगळली गेली, नवीन नाव कशी निवडली गेली, काहींनी आपले पद कसे वाचवले, याच्या अनेक कहाण्या दिल्लीतील सत्तेच्या वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. 

भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांचे पद गेल्याची आधी चर्चा झाली आणि नंतर ते पदावर असल्याचे स्पष्ट झाले. त्या आठ तासांत बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामुळे दानवे यांचे पद कसे काय राहिले आणि त्यानंतर त्यांना रेल्वे आणि कोळसा अशी महत्वाची खातीही मिळाली. हा सारा बदल कसा झाला, याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

दानवेंचे पद यामुळे वाचले...

ज्यां मंत्र्यांना नारळ द्यायचा त्या यादीत सुरवातीला रावसाहेब दानवे पाटील यांचेही नाव होते असे खात्रीलायकरीत्या कळते. मात्र ते हुशार निघाले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना दानवे यांच्यासारख्या जनसंघापासूनच्या ज्येष्ठ मराठा पक्षनेत्यावर भाजपने हा अन्याय केला असा मेसेज यातून जाईल तेव्हा तुम्हीच बघा बुवा, असा संदेश त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाकडे व्यवस्थितपणे पोहोचविला गेल्याचे समजते. तिकडून दिल्लीला फोनाफोनी झाली आणि... दुपार उलटता उलटता दानवे निर्धास्त झाले. त्यानंतर त्यांना एकदम चांगली खातीही मिळाली.

त्यांच्याकडे ग्राहक संरक्षण असे खाते होते. त्या खात्याचे हिंदीतील नाव उपभोक्ता मामलोंके मंत्री, असे आपल्याला सुरवातीला घेताही येत नव्हते, अशी कबुली दानवे यांनी भाजपच्या पिंपरी-चिंचवड येथे भरलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आधी दिली होती. हे खाते काय करते, हे पण माहिती असायची कारण नव्हते. त्या तुलनेत रेल्वेसारखे महत्वाचा विभाग मिळाल्याने दानवे यांचा काम करून दाखविण्यास चांगली संधी मिळाली आहे. मराठवाड्यातील रेल्वेमार्गाची अनेक कामे रखडली आहेत. ती पूर्ण करण्याची संधी दानवे यांना या नव्या फेरबदलात मिळाली आहे. रेल्वे मंत्रालय हे रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय या खात्याचे कॅबिनेट मंत्री अश्विन वैष्णव यांनी घेतला आहेच. त्याबद्दल दानवे यांनीही स्वतंत्रपणे व्हीडीओ जारी करत या निर्णयाचे समर्थन केले आहे. पुढील अडीच वर्षे दानवे आता मराठवाड्याला काय देणार, याची उत्सुकता आहे. 

वाचा या बातम्या : प्रकाश जावडेकर, प्रसाद यांना हटविण्याची ही आहेत कारणे....

वैष्णव आणि दानवे यांच पटायचं कसं?

केदार आणि पटोले पावसात भिजले पण राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख