Gopinath Munde had lamented that the then Chief Minister's phone did not come. | Sarkarnama

‘तेव्हा` मुख्यमंत्र्यांचा फोन न आल्याबद्दल गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केली होती खंत..

(अर्जून खोतकर, माजी मंत्री)
मंगळवार, 2 जून 2020

वंजारी सेवा संघ महाराष्ट्रच्या वतीने लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त `आठवणतील मुंडे साहेब`या व्याख्यानमालेत अर्जून खोतकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक प्रसंगांवर प्रकाश टाकला. त्यानिमित्त त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.

औरंगाबाद :  गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री असतांनाचा तो प्रसंग आजही आठवतो. विमानाने ते दौऱ्यावर निघाले होते, विमानाने उड्डाण घेतले आणि क्षणार्धात विमानाची एक काच निखळून खाली पडली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुखरूप पणे विमान खाली उतरवले, आणि एका मोठ्या अपघातातून मुंडे साहेब वाचले.  मी तातडीने मुंबई गाठली, साहेबांच्या बंगल्यावर पोहचलो. प्रकृतीची चौकशी केली, पण `अर्जून मला अजून मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही रे`, अशी खंत त्यांनी माझ्याजवळ बोलून दाखवली.

मुंडे साहेंबाची नाराजी त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती, त्यामुळे मी त्यांच्या भेटीनंतर थेट मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे गेलो. मुंडे साहेब एका मोठ्या विमान अपघातातून बचावले आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे असे सांगतिले. तोपर्यंत जोशी सरांनी देखील पोलिस आयुक्त आणि यंत्रणेकडून संपुर्ण घटनेची माहिती घेतली होती. मुंडे यांना अपघाताच्या प्रसंगातून सावरू द्या, मग मी त्यांच्यांशी बोलतो असे सर म्हणाले. मी लगेच मुंडे साहेबांना फोन लावून दिला, सरांनी त्यांची अस्‍थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी यांच्यामध्ये मी नेहमीच ब्रीज होण्याचा प्रयत्न केला. 

विमान अपघातातून बचावल्यानंतर काही दिवसांनी गोपीनाथ मुंडे मंत्रालयातील आपल्या दालनात आले. त्यांना भेटण्यासाठी मंत्रालयातील मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांनी एकच गर्दी गेली. तेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो. मुंडे साहेब आपल्या दालनात आले आहेत, आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे असे सांगितले. सरदेखील क्षणाचाही विलंब न लावता मुंडे साहेंबाच्या दालनाकडे निघाले. तिथे त्यांनी मुंडेची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा फोन नाही अशी खंत व्यक्त झाली तेव्हा, मी फोनवरून मुंडे साहेब सरांचे बोलणे करून दिले, मंत्रालयात मुंडे साहेबांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलो. मी दोघांच्या संबंधात नेहमीच ब्रीज होण्याचा प्रयत्न केला.

युती सरकारमध्ये मुंडे साहेंबासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. हातात केवळ कोरा कागद घेऊन मराठवाडा आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते अभ्यासपूर्ण मांडायचे. सत्तेत असतांना त्यांनी ते सोवण्यासाठी प्रयत्न केले. ते जेव्हा सभागृहात बोलायला उभे राहायचे तेव्हा सगळे आमदार त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकायचे. राज्‍याचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी मुंबईतली गुंडगिरी मोडून काढली हे देखील या निमित्ताने आवर्जून सांगावे लागेल.

मला ते मुला सारख मानायचे, त्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध होते.  मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबद्दल त्यांना नेहमीच काळजी असायची. मुंबईत एकदा ओबेरॉय हॉटेलमध्ये बसलो असतांना ते शून्य नजरेतून अथांग समुद्र न्याहाळत होते. मी त्यांना विचारले, तेव्हा अर्जून बघ ना हा खाऱ्या पाण्याचा समुद्र इथे मुंबईत कसा खळाळतोय, तिकडे माझ्या मराठवाड्यात मात्र पाण्याच्या थेंबासाठी लोकांना वणवण करावी लागते, अशी खंत ते व्यक्त करायचे.

(शब्दांकनः जगदीश पानसरे)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख