सचिन वाझेला भेटणारी ती बाई कोण आणि ती त्याच्यासोबत काय करायची? - Who is the woman she meets Sachin Waze and what does she want to do with him? | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेला भेटणारी ती बाई कोण आणि ती त्याच्यासोबत काय करायची?

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय या हत्या झाल्या असणार आहेत का?

मुंबई : सचिन वाझे हा १०० कोटी रुपये कमावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत होता की गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यायचा? पोलिस अधिकारी हे सुरक्षा व्यवस्था राखण्याचे सोडून फक्त मंत्र्यांना कमवून देण्याचं काम करत होते का? वाझे एपीआय होता, तर त्याच्याकडे एवढ्या गाड्या कशा? तसेच, ऑबेराय हॉटेलमध्ये वाझे याच्यासोबत एका बाईचा व्हिडिओ आहे. ती बाई कोण आणि ती त्याच्यासोबत काय करायची?, अशा प्रश्नांचा भडिमार भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. ते म्हणाले की राज्यात इशा सालेन, पूजा चव्हाण, मनसुख हिरेन असा किती हत्या झाल्या आहेत. कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय या हत्या झाल्या असणार आहेत का? सचिन वाझेची सरकारकडे वेगळीच वट आहे. सचिन वाझे आणि आयुक्त यांना वाचवण्यासाठी हे सुरू आहे. कमिशनर म्हणत आहेत की गृहमंत्री शंभर कोटी मागत आहेत. सुशांतसिंग राजपूत आत्महत्यासंदर्भात सीबीआयची नेमणूक करण्यात आली. मग वाझे प्रकरणातच का नाही, असा प्रश्नही राणे यांनी या वेळी विचारला.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. मात्र या सरकारकडे काम करण्यासंदर्भात काहीही नियोजन नाही. एक मात्र अंडरस्टॅंडिंग आहे, ते मात्र, आमच्या खात्यात ढवळाढवळ करू नका, असे. म्हाडामध्ये सध्या धुमाकूळ सुरू आहे. काम करायच्या अगोदरच पैसे काढण्यात येत आहेत. इस्टीमेट 20 टक्के  वाढवून दिले जात आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी ते  २० टक्के इस्टिमेट वाढविले जात आहे. कोरोनामुक्त राज्य करायला पैसे नाहीत आणि असे खायला पैसे आहेत, असा आरोप राणे यांनी यावेळी केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी (ता. १ एप्रिल) पार पडला. त्या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील असं आम्हाला वाटत होतं. कारण, देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकासाठी ती जागा मिळवून दिली होती. मुख्यमंत्र्यांचा काय तो खासगी कार्यक्रम होता का? प्रोटोकॉल पाळायला नकोत का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला नव्हते. किती संकुचित वृत्ती आहे, आहे त्यांची. या राज्याला  यशवंतराव चव्हाण यांचा वारसा आहे, हे विसरता कामा नये, असेही माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुनावले.

...मगच राज्यात लॉकडाऊन करा 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. मी मातोश्रीत बसतो, तुम्ही तुमच्या घरी बसा, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग खायचं काय. दोन वेळेच्या जेवणाचं पॅकेट मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी देणार आहेत का. लॉकडाऊनमुळे राज्यातील जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणून लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असे भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. 

पवार-शहा भेट राज्याच्या हिताची 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली की नाही, हे मला माहीत नाही. पण, त्या दोघांची भेट झाली असेल तर राज्याच्या हिताची आहे. पण, ती शिवसेनेसाठी पोषक नाही, अशा सूचक शब्दांत भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पवार-शहा भेटीवर भाष्य केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख