... जेव्हा सुबोध जयस्वाल यांनी दंगेखोर आमदाराच्या कानाखाली ओढली होती! - when Subhod Jaiswal slapped MLA in Aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

... जेव्हा सुबोध जयस्वाल यांनी दंगेखोर आमदाराच्या कानाखाली ओढली होती!

योगेश कुटे
बुधवार, 26 मे 2021

जयस्वाल हे सीबीआयला पिंजऱ्यातून बाहेर काढतील?

सीबीआयच्या (CBI) संचालकपदी सुबोध जयस्वाल (Subhodh Jaiswal) यांची केंद्र सरकारने निवड केली. महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक राहिलेले आणि या सीबीआयच्या सर्वोच्च पदावर गेलेली नावे जवळपास नाहीत. जयस्वाल यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र केडरचा अधिकारी सर्वोच्च तपास संस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचला आहे. अनेक संवेदनशील, राजकीय परिणाम करणाऱ्या, बड्या नेत्यांचा तपास ही संस्था सध्या करते आहे. त्यामुळे या पदाला वेगळेच महत्व आहे.  पोलिस दलात  कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जयस्वाल आणि वाद हे काही नवीन समीकरण नाही. त्यांच्याशी पंगा घेणाऱ्यांना त्यांनी कधीच सोडले नाही, असाही त्यांचा इतिहास आहे. त्यात काही बडे राजकीय नेते देखील आहेत. SPG, RAW अशा ठिकाणी काम केल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात आले. मुंबईचे पोलिस आयुक्त आणि नंतर राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली. आता ते सीबीआयचे संचालक म्हणून जबाबदारी पाहतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळू शकतो. 

औरंगाबादची गाजलेली कारकिर्द

सुबोध जयस्वाल यांचे नाव औरंगाबादकर कधीच विसरणार नाहीत. इतका त्यांचा दबदबा औरंगाबादमध्ये होता. 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जयस्वाल यांचे पहिले पोस्टिंग याच शहरात झाले होते. तेव्हा औरंगाबाद शहरात आयुक्तालय नव्हते. पोलिस अधीक्षकाच्या नियंत्रणाखालीच जिल्हा व शहर होते. सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी औरंगाबादमध्ये पाऊल टाकले. औरंगाबाद शहर आणि दंगल असे समीकरण तेव्हा रूढ झाले होते. कोणत्या ना कोणत्या कारणांवरून तेथे दोन समुदायांत दंगली घडायच्या. मे 1988 मध्ये अशीच मोठी दंगल शहरात उसळली होती. तरुण रक्ताच्या जयस्वाल यांनी मग दंगेखोरांना बदडण्यास सुरवात केली. काही दंगेखोरांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांना सोडविण्यासाठी तत्कालीन एक आमदार हे जयस्वाल यांच्या कार्यालयात आले. `ही माझी माणसं आहेत, त्यांना सोडा,`, असा हेका या आमदाराने धरला होता. जयस्वाल यांनी त्याला सुरवातीला जुमानले नाही. माझ्या माणसांना सोड नाहीतर तुझी 24 तासांच्या आत बदली करतो, अशी धमकी या आमदाराने दिल्यानंतर आपल्या खुर्चीवरून जयस्वाल उठले आणि त्यांना खाडकन त्या आमदाराच्या कानाखाली लावली. तुला काय करायचे ते कर, मी या पोरांना सोडणार नाही, असे सांगितले. ते नुसते कानाखाली बजावून थांबले नाहीत तर यापेक्षा आक्रमक रूप जयस्वाल यांनी धारण केले होते. त्यांच्या या किश्श्याची संपूर्ण शहरात चर्चा रंगली आणि एक वेगळेच पाणी औरंगाबादकरांना पाहायला मिळाले. 

गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्याशी पंगा

जयस्वाल यांना काही महिन्यांनी तेथेच मग अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून बढती मिळाली. त्यावेळेचे पोलिस अधीक्षक हे दीर्घकालीन सुटीवर होते.  त्यामुळे अधीक्षकपदाचा जयस्वाल यांच्य़ाकडेच आला. या काळात त्यांनी दंगेखोर, टवाळखोर यांच्यावर अशी दहशत बसवली की ते असेपर्यंत शहरात फारसा अनुचित प्रकार घडला नाही. त्यांचा इतका दरारा होता की औरंगाबाद रात्री 11 च्या ठोक्याला बंद होत असे. त्यांनी औरंगाबादमध्ये चार वर्षे विविध पदांवर काम केले. त्यांची उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली. ती रद्द करावी यासाठी 400 हून अधिक निवेदने सरकारला पाठविण्यात आली होती. 

उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून ते रुजू झाले. तेव्हा तेथे पद्मसिंह पाटील यांचा दबदबा होता. पाटील यांच्याकडे तेव्हा गृहखातेदेखील होते. राज्यातील क्रमांक दोनचे नेते म्हणून पाटील यांचा दबदबा होता. पण जयस्वाल यांच्या कुंडलीत गृहमंत्र्यांशी फारसे सख्य नसल्याचा योग तेव्हापासूच होता. त्यामुळे साहजिकच पाटील व त्यांचे खटके उडाली. पद्मसिंह पाटीलही लेचेपेचे नेते नव्हते. त्यांनी जयस्वाल यांची बदली थेट गडचिरोलीला केली. जयस्वाल यांनी मग केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याचा ठरविले. ते मग पंतप्रधानांसह महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या विशेष सुरक्षा पथकात (SPG) गेले. तेथे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षापथकात दिसू लागले. त्यांनी मग केंद्रीय सेवेतच काही वर्षे काढली.

पोलिस महासंचालकांची केली होती चौकशी

जयस्वाल यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचे प्रकरण म्हणजे मुद्रांक गैरव्यवहारासाठी गाजलेल्या तेलगी घोटाळ्याचा तपास. या घोटाळ्याच्या तपासासाठी मुंबई उच्च न्यायालायच्या निगराणीखाली एस. एस. पुरी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. तेव्हा पोलिस उपमहानिरिक्षक असलेले जयस्वाल या पथकात होते. त्यांची नियुक्ती राखीव पोलिस दलात होती. पण खास बाब म्हणून त्यांची या पथकात नियुक्ती झाली होती.  या पथकाने मुंबईचे पोलिस आयुक्त रणजित शर्मा, श्रीधर वगळ यांच्यासह अनेकांना अटक केली होती. तत्कालीन पोलिस महासंचालक सुभाष मल्होत्रा हे पदावर असताना त्यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी या पथकाने केली होती. घामेजलेले मल्होत्रा चौकशीच्या ठिकाणाहून बाहेर पडतानाचे छायाचित्र तेव्हा खूप गाजले होते.  तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ हे पण तेव्हा संशयाच्या फेऱ्यात होते. पुरी व जयस्वाल हे त्यांना कधीही बोलवतील, अशी शक्यता तेव्हा व्यक्त केली जात होती. पण त्यानंतर हा तपास सीबीआयकडे गेला आणि राज्यातील अनेक नेत्यांनी सुस्करा सोडला. त्यानंतर भुजबळ यांनाही वेगळ्या कारणांमुळे गृहमंत्रीपद सोडावे लागले. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकात त्यांची नियुक्ती झाली. मालेगाव बाॅम्बस्फोटाच्या तपासातही ते होते.

त्यानंतर त्यांनी पुन्हा केंद्रीय सेवांत जाण्याचा निर्णय घेतला. `राॅ`मध्ये त्यांनी तब्बल नऊ वर्षे सेवा केली. सीबीआयमध्येही त्यांनी या आधी काम केले आहे. त्यामळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचाही त्यांना चांगला अनुभव आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांपैकी ते मानले जातात.  ते 2018 मध्ये पुन्हा राज्यात आले. त्यांची मुंबई पोलिस आय़ुक्त म्हणून आधी नियुक्ती झाली. ते 2019 मध्ये राज्याचे पोलिस महासंचालक झाले. या काळातील त्यांचा एक गाजलेला आदेश अनेक पोलिस अधिकाऱ्यांना अजूनही डाचतो आहे. लाच प्रकरणात पोलिस कर्मचारी, अधिकारी सापडला की त्याला थेट बडतर्फ करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यामुळे पोलिस खात्यातही त्यांच्या नावाचा दरारा होता. चुकीचे काम करणाऱ्याला पाठीशी न घालणारे म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्रात कायम राहिली.

राज्यात महाविकास आघाडी सरकार 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर जयस्वाल यांचे पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राज्यकर्त्यांशी खटके उडू लागले. काही प्रकरणांत डोक्यांवरून पाणी जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन पण चुकीचे काम करणार नाही, असे अधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले. काही अधिकाऱ्यांच्या नावांना त्यांचा तीव्र विरोध होता. तरीही या नावांना एकदम क्रिम पोस्टिंग मिळण्याचे सत्र सुरूच राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा केंद्रिय सेवांत जाण्याचा निर्णय घेतला. या वेळीही त्यांचे गृहमंत्र्यांशी म्हणजे अनिल देशमुखांशी पटले नाही. (अनिल देशमुख यांची चौकशी सीबीआय करत आहे आणि जयस्वाल तिचे प्रमुख झाले, हा आता योगायोगच)  महाराष्ट्राचे पोलिस महासंचालकपद सोडल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) महासंचालक म्हणून काम केल्यानंतर त्यांना सीबीआयच्या संचालकपदी नेमण्यात आले आहे. देशातील नामांकित आणि सर्वोच्च तपास संस्था म्हणून सीबीआयचा लौकीक आहे. असे असले तरी `पिंजऱ्यातील पोपट` म्हणूनही या संस्थेवर टीका केली जाते. जयस्वाल हे स्वतः पिंजऱ्यात राहणारे नाहीत. ते संस्थेला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होतात की नाही, यावर आता लक्ष असेल. 

वाचा या बातम्या : जयस्वाल यांच्या धसक्याने औरंगाबाद रात्री अकराच्या ठोक्याला बंद होत असे...

सुबोध जयस्वाल यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख