दिलीप माने सुभाष देशमुखांशी पुन्हा दोन हात करण्याच्या तयारीत

शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊनही दिलीप माने यांना ‘शहर मध्य’चे अपेक्षित लक्ष्य साधण्यात अपयश आले.
In the South Solapur constituency, Dilip Mane turned his attention agai
In the South Solapur constituency, Dilip Mane turned his attention agai

सोलापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढलेले माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा एकदा दक्षिण सोलापूर या मूळ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते सध्या शिवसेनेत असले तरी मनाने राष्ट्रवादीच्या जवळ आहेत. त्यामुळे ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर विधानसभा लढणार, हे मात्र अस्पष्ट आहे. (In the South Solapur constituency, Dilip Mane turned his attention again)
 
दिलीप माने हे २००९ मध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर दक्षिण सोलापूरमधून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतरच्या २०१४ च्या निवडणुकीत मात्र मोदी लाटेत त्यांचा दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला. मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्याचे विभाजन होऊन माने यांचे वर्चस्व असलेला बराचसा भाग हा दक्षिण सोलापूर मतदारसंघाशी जोडला गेला आहे, त्यामुळे २०१४ मध्ये झालेला पराभव हा त्यांच्याशी धक्कादायक होता. पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघाशी संपर्क कायम ठेवला होता. 

विविध सहकारी संस्था, बॅंका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सत्ता या माध्यमातून दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने जिंकलेल्या जागा आणि राज्यातील युतीच्या दिशेने वाहणारी हवा पाहून माने यांनीही पक्षांतराचा निर्णय घेतला. त्यात त्यांनी भाजपऐवजी शिवसेनेत जाणे पसंत केले, त्यामागे अर्थातच तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत ह्यांचा हात होता. शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊनही दिलीप माने यांना ‘शहर मध्य’चे अपेक्षित लक्ष्य साधण्यात अपयश आले. मोठी ताकद लावूनही त्यांना एकेकाळच्या सहकारी प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. युक्ती आणि शक्तीच्या जोरावर ऐनवेळी पारडे फिरवण्याची धमक असलेल्या माने यांना त्यावेळी निवडणुकीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता, हेही तितकेच खरे आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय घडामोडी घडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर आली. माने सध्या शिवसेनेत असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी वाढलेली जवळीक लपून राहिलेले नाही. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी ते संपर्क ठेवून आहेत. विधानसभा निवडणुकीस आणखी अवकाश असला तरी समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून त्यांनी दक्षिण सोलापूरवर पुन्हा लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्या ठिकाणी त्यांची पुन्हा सुभाष देशमुख यांच्याशी लढत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने माने यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून जोरदार पुनरागमन करण्याची तयारी चालवली आहे.

दरम्यान, सोलापुरात (कै.) ब्रम्हदेवदादा माने बॅंकेत झालेल्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने यांनी ‘दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांसाठी मी पूर्ण वेळ देणार आहे. या तालुक्‍यातील कार्यकर्त्यांना आगामी काळात बळ देणार असल्याची ग्वाही दिली आहे. माने यांचा वाढदिवस पुढील महिन्यात आहे. कोरोनाच्या संकटात रुग्णांसाठी व गोरगरीबासांठी मदत होईल, असेच विधायक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबविण्याचा निर्णय या बैठकीत झाला. 

बैठकीत अप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, चंद्रकांत खुपसंगे, राम गायकवाड, सचिन गुंड, प्रथमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस अप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, चंद्रकांत खुपसंगे, नागेश बिराजदार, श्रीशैल पाटील, प्रथमेश पाटील, रावसाहेब पाटील, प्रमोद शिंदे, रईस पटेल, शकील कुडले, राम गायकवाड, निखिल देशपांडे, ईरण्णा जावळे, सचिन गुंड, विकास पाटील, प्रकाश पवार, रवी राठोड, गुरुनाथ कोट्टलगी, तुळजाराम नरोटे, किशोर माने, हणमंत मोतीबने, अंबादास कोळी, प्रकाश होसाळे उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com