गोपीचंद पडळकरांच्या आमदारकीचे वंचित आघाडीने केले स्वागत

पडळकर हे आरएसएसशी संबंधित असूनही त्यांना प्रकाश आंबेडकर का महत्वाची पदे आहेत, अशी जाहीर टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर हे भाजपला सोयीस्कर काम करत असल्याचा आरोप करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडी सोडण्याची घोषणा केली होती.
sangli vanchit aaghadi welcomes gopichand padalkars mlc post
sangli vanchit aaghadi welcomes gopichand padalkars mlc post

पुणे: वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर हे आता विधान परिषदेवर बिनविरोध आमदार झाले आहेत. त्यांच्या आमदारकीचे वंचित आघाडीच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षांत गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास वेगवान राहिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भाजप ठोस भुमिका घेत नसल्याने पडळकरांनी भाजपशी संबंध नसल्याचे जाहीर करत उत्तम जानकर यांच्या साथीने आरक्षण आंदोलन सुरू केले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पडळकर व उत्तम जानकर हे इच्छुक होते. सांगलीत पडळकरांना तर माढ्यात उत्तम जानकरांना तिकीट हवे होते. पडळकरांनी भाजपबरोबरच काँग्रेसकडेही प्रयत्न चालवले होते. काँग्रेस आघाडीत सांगलीची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला गेल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र तिन्ही ठिकाणी तिकीट न मिळाल्याने अगदी शेवटच्या क्षणी पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीला तिकीट मागितले. त्यानंतर मोठा वाद झाला, मात्र प्रकाश आंबेडकरांनी पडळकरांना तिकीट दिले.

'वंचित' आरोपीच्या पिंजऱ्यात

लोकसभेचे वातावरण तयार होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीत यावे म्हणून प्रयत्न सुरू होते, मात्र आंबेडकर स्वतंत्रपणे लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी वंचितच्या उमेदवारांमुळे आघाडीचे उमेदवार पडणार व भाजपचे उमेदवार विजयी होणार, असे गणित मांडले गेते. वंचित आघाडी ही भाजपची 'बी टीम' आहे असा जाहीर आरोप करण्यात येत होता. त्यातच पडळकरांना उमेदवारी जाहीर केल्यावर पुन्हा तो आरोप नव्याने आणि धारधारपणे झाला. कारण पडळकरांना तिकीट मिळाल्यावर पडळकर आणि संभाजीराव भिडे यांच्या संबंधाचे फोटो व्हायरल झाले. वंचित आघाडी अस्तित्वात येत असताना कोरेगाव भीमा येथील दंगलीला भिडे जबाबदार असल्याचे आरोप स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. वंचित आघाडीची हवा तयार होण्याला कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा कारणीभूत ठरला होता. मग भिडे यांचे कार्यकर्ते असलेल्या पडळकरांना वंचित तिकीट कशी काय देवू शकते? असा सवाल उपस्थित झाला होता. या वादाची मोठी चर्चा झाली. तरीही पडळकरांना प्रकाश आंबेडकरांना तिकीट दिले होते. पडळकरांचे स्वत:चे संघटन, वंचितची हवा आणि तासगाव आणि कडेगावमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीने केलेल्या सहकार्यामुळे पडळकरांनी 3 लाखाच्या वर मते घेतली. ही मते प्रकाश आंबेडकरांना अकोला, सोलापूरमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती. 

महासचिवपदाची जबाबदारी

पडळकरांना वंचित आघाडीच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतदान मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाची राज्यात चर्चा झाली. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही  पडळकरांचे कौतुक केले होते. दरम्यान वंचित आघाडीच्या कार्यकारणिची रचना झाली. त्यात पडळकरांना महासचिव करण्यात आले. तो निर्णय वंचित आघाडीच्या स्थापनेसाठी प्रमुख भुमिका निभावलेले नेते लक्ष्मण माने यांना आवडला आहे. पडळकर हे आरएसएसशी संबंधित असूनही त्यांना प्रकाश आंबेडकर का महत्वाची पदे आहेत, अशी जाहीर टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर हे भाजपला सोयीस्कर काम करत असल्याचा आरोप करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडी सोडण्याची घोषणा केली होती. 

वंचित आघाडीचे दावे

या संपुर्ण प्रक्रियेत वंचित आघाडी पडळकरांच्या बाजूने होती. पडळकरांचे वैचारिक परिवर्तन झाल्याचा दावा वंचितच्या प्रवक्त्यांनी केला होता. तर संभाजी भिडे यांची ताकद कमी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पडळकरांना वंचित आघाडीत घेतल्याचे अण्णाराव पाटील यांनी म्हटले होते. वंचित आघाडी पडळकरांचे ताकदीने समर्थन करत असताना दुसऱ्या बाजूला पडळकरांच्या भाजपसोबत वाटाघाटी सुरू होत्या. शेवटी विधानसभा निवडणुका जाहीर होत असताना पडळकरांनी
अधिकृतपणे भाजप प्रवेश केला. त्यावेळी वंचित आघाडीने काही प्रतिक्रया दिलेली नव्हती. पडळकारांचा वंचित आघाडीतील प्रवास चार महिन्याचाच राहिला.पडळकर बारामतीत भाजपकडून उभे राहिले, मात्र त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.

उमेदवारीवरून भाजपमध्ये वांदग

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली. त्यावेळी एकनाथ खडसे, पंकाजा मुंडे या महत्वाच्या नेत्यांना डावलण्यात आले. पडळकरांवरून भाजपमध्ये वादंग माजला. सांगलीतील भाजप नेत्या नीता केळकर यांनी तर या पडळकरांचे कर्तृत्व ते काय, अशी टीका केली. तर मोदींवर टीका करणाऱ्यांना आमदार कसे करता, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. भाजपमधून पडळकरांना मोठा विरोध झाला असलातरी वंचित आघाडीने स्वागत करण्याची भुमिका घेतली आहे. पडळकर आमदार होवून सांगली जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव हे तासगावमध्ये हार तुरे घेवून उभे होते. त्यांनी पडळकर यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. डॉ. विवेक गुरव हे पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांचे पुत्र आहेत. प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांची भुमिका सातत्याने भाजपविरोधी राहिली आहे. डॉ. विवेक गुरव यांनी पडळकरांच्या बाबतीत आपली स्वतंत्र भुमिका घेतली आहे. तशी फेसबुक पोस्टही त्यांनी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com